उरण : जेएनपीटी ते आय ओ टी एल(धुतुम) या तेल वाहिनीला बुधवारी पहाटे गळती लागल्याने उरण ते नेरुळ बेलापूर या मार्गावरील लोकल सेवा दुपारी १२ वाजल्या पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला आहे. जेएनपीए बंदर ते इंडियन ऑईलची तेल वाहिनी ही उरण बेलापूर/नेरुळ लोकल मार्गावरील न्हावा शेवा स्थानका नजीकच्या पागोटे उड्डाणपूला खालून जाणाऱ्या रेल्वे रुळा नजीक ही गळती झाल्याने गळती पेट्रोल वेपोर ची घनता पाचच्या वर असेल तर रिस्क झोन असते सध्या घनता सात आहे.
रेल्वे ही इलेक्ट्रिक असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिडकोच्या अग्निशमन दलाला ही तैनात करण्यात आले आहे. जेएनपीए बंदरात विविध देशातून जहाजांमधून कोट्यवधी लीटर तेल आणले जाते. हे तेल साठवणूक करण्यासाठी धुतुम येथे टॅंक फार्म उभारण्यात आले आहे. या मध्ये तेल वाहिन्यांद्वारे तेल वाहून आणून त्याची साठवणूक केली जाते. ही वाहिनी न्हावा शेवा आणि शेमटीखार या दोन स्थानकांच्या रेल्वे रुळाच्या खालून जात आहे. यातील वाहिनीला गळती लागली आहे. तेल गळतीमुळे खारकोपर ते उरण दरम्यानचा लोकल मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव पुढील काळासाठी बंद करण्यात आला आहे. अशी माहीती रेल्वे विभागाने दिली आहे.
जेएनपीए बंदरातून धुतुम मधील टॅंक फार्म पर्यंत जाणाऱ्या तेल वाहिनीला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यात आली आहे. मात्र त्यामुळे गळती झालेल्या तेलावर फोम टाकण्यात आला आहे. तर सुरक्षा म्हणून या ठिकाणावरून जाणाऱ्या रेल्वे लोकल ही बंद करण्यात आल्या असल्याची माहीती उरणचे तहसीलदार डॉ.उद्धव कदम यांनी दिली.
तेल गळतीचे कारण काय ? जेएनपीए बंदरातून दररोज कोट्यवधी लीटर तेल व तेलजन्य तसेच अति ज्वलनशील पदार्थांची वाहन्यात येतात मात्र या तेल वाहिन्याना छिद्र पाडून तेलाची चोरी होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचप्रमाणे आशा पद्धतीने तेल गळती झाल्याने येथील नागरिकांनाही धोका निर्माण निर्माण झाला आहे.
