पालघर : सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल स्वतंत्र नोंदणी करण्याच्या आदेशाविरुद्ध पालघर जिल्ह्यातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संस्थेच्या माध्यमातून ऍलोपॅथी डॉक्टरांनी आंदोलन छेडण्यात आले होते. राज्य सरकारने याची दखल न घेतल्यास हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात होमिओपॅथी डॉक्टरांनी सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट् मेडिकल कौन्सिल (MMC) च्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये करण्याचे नर्देश दिले आहेत. या निर्णयाचा भारतीय वैद्यकीय संघटना (IMA) महाराष्ट्र राज्याने तीत्र विरोध दर्शविला असून एक दिवसीय राज्यस्तरीय संपाची हाक दिली होती.

आयएमए च्या बोईसर पालघर शाखेतील १२० सदस्यांसह डहाणू व वसई येथील शाखेतील ऍलोपथी डॉक्टरांनी आज दिवसभर आपले दवाखाने व रुग्णालय बंद ठेवले होते.

आंदोलनाची पार्श्वभूमी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत समजवण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आयएमएने स्पष्ट केले की, नव्याने मान्यता दिलेले होमिओपॅथी डॉक्टर आधीच महाराष्ट्र होमिओपॉथिक कोन्सिलमध्ये नोंदणीकृत आहेत. शासनाने घेतलेला हा निर्णय ११ जुलै २०२४ रोजीच्या स्वतःच्या परिपत्काच्या विरोधात असून या संदर्भांतील खटला माननीय मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असताना काढलेले हे परिपत्रक कायद्याला धरून नसलेले व न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आयएमए या संस्थेने मिक्सोपॅथी अशा मिश्र वैद्यकीय प्रणालीच्या विरुद्ध असून शासनाच्या या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षितेवर गंभीर धोका निर्माण होईल, आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचा तसेच व्यवसायाचा दर्जा घसरेल अशी भीती व्यक्त करण्यात आली. तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल कायद्याचे उल्लंघन होईल, अशी भूमिका आयएमएने मांडली आहे. तर अपुरे प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टराकडून रुग्णांवर उपचार म्हणजे थेट त्यांच्या जीवाशी खेळ असल्याची भीतीही आयमएकडून व्यक्त करण्यात आली आहे.

एका दिवसीय आंदोलनात जिल्ह्यातील ऍलोपथी डॉक्टरांनी आपत्कालीन सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती आयएमए बोईसरच्या अध्यक्षा डॉ. मिलन कामत यांनी दिली आहे, तसेच शासनाने हा निर्णय मागे घेतला नाही तर पुढील आठवड्यात मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा आणि बेमुदत उपोषणही छेडण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे.

दरम्यान पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात डॉक्टर उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी गैरसोय याकडे उपस्थित पत्रकारांनी लक्ष वेधले. तसेच जिल्ह्यात इतर मान्यता प्राप्त नसलेल्या डॉक्टरांकडून तसेच बोगस डॉक्टरांकडून होणाऱ्या उपचारांबाबत आयएमए ने ठोस भूमिका घ्यावी असे सुचित करण्यात आले. त्यावर आयएमए ने जिल्हा प्रशासनाकडे बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई करण्याची अनेकदा मागणी केल्याचे सांगत त्यांच्याविरुद्ध देखील सातत्याने व कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

शासनाने निर्गमित केलेल्या नवीन आदेशामुळे होमिओपॅथी डॉक्टरांना मागच्या दाराने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये प्रवेश दिला जात असल्याचे आरोप करण्यात याप्रसंगी आयएमए बोईसरचे पदाधिकारी डॉ. प्रकाश गुडसुरकर, डॉ. सूर्यकांत संखे, डॉ. प्रकाश बाबू व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.