पालघर : पालघर जिल्ह्यातील ऐतिहासिक शिरगाव कोट किल्ल्यावर २२ जानेवारी रोजी तोफगाडा दुर्गार्पण सोहळा उत्साहात पार पडला.  मराठमोळय़ा पद्धतीने हा तोफगाडा पुन्हा नव्याने उभा राहिल्याने शिरगाव भुईकोट किल्ल्याचे आकर्षण वाढले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वराज प्रतिष्ठान शिरगाव व स्वराज्यकार्य टीम, कोहोज यांच्या संयुक्त विद्यमाने २८५ व्या ऐतिहासिक शिरगाव कोट विजय दिनानिमित्त हा सोहळा पार पडला.  लोकसहभागातून व लोक मदतनिधीतून  दुर्लक्षित तोफ पुन्हा नव्या मजबूत सागवानी तोफगाडय़ावर विराजमान केली. तोफगाडय़ाचे पूजन राजन कृष्णा पाटील व मिलिंदा राजन पाटील कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. दुर्गमित्रांनी बुरुजांचा परिसर भगवे तोरण, आंब्याची पाने, झेंडूची फुले इत्यादींनी सजवला होता.

किल्ले वसई मोहिमेचे प्रमुख व इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी शिरगाव किल्ल्याचा १८ व्या शतकातील इतिहास, वसईची मोहीम घडामोडी, वीर मराठय़ांचा पराक्रम, किल्ल्यातील वास्तू, तोफ संवर्धनाची आवश्यकता, आगामी संवर्धन मोहिमा इत्यादी विषयांवर उपस्थितांना  मार्गदर्शन केले.

किल्ल्यातील सर्व वास्तूंवर वास्तुविशेष नावे फलक लावण्यात आलेले आहेत.  दुर्गमित्र अक्षय किणी, निखिल मोरे, योगेश मोरे, शुभम पाटील, अक्षय पाटील, परेश गावड, तुषार पाटील, कौशल्य राऊत, आदित्यनाथ शिंगरे, राज्य पुरातत्व विभाग मुंबई यांच्या सक्रिय सहभागाने सदर उपक्रम यशस्वी झाला.  मुंबई, ठाणे, पालघर, डहाणू, वसई, भाईंदर भागातून आलेल्या दुर्गमित्रांनी  प्रत्यक्षात भेट दिली. 

शिरगाव किल्ल्याच्या संवर्धनासाठी, उत्तम सुशोभीकरणासाठी आम्ही समस्त दुर्गमित्र अत्यंत कटिबद्ध आहोत, असे स्वराज प्रतिष्ठान, शिरगावचे प्रमुख तुषार पाटील यांनी सांगितले. तर   मराठय़ांच्या पराक्रमाची साक्ष जपणारी ही घटना कायमस्वरूपी स्मरणात राहील, असा विश्वाास श्रीदत्त राऊत यांनी व्यक्त केला.

दुर्लक्षित किल्ला

समुद्री भागातून होणाऱ्या हल्ल्यावर देखरेख ठेवण्यासाठी हा भुईकोट किल्ला पोर्तुगीजांनी उभारला. मराठय़ांनी चिमाजी अप्पा यांच्या कार्यकाळात हा किल्ला सन १७३९ मध्ये सरदार मल्हार हरी यांच्या नेतृत्वाखाली जिंकला. त्यानंतर सन १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांचा ताब्यात गेला होता. स्वातंत्र्योत्तर काळात हा किल्ला दुर्लक्षित राहिला.

वसईकरांची कलाकृती

शिरगाव किल्ल्यावरील तोफखान्याचे विशेष म्हणजे मराठमोळय़ा पद्धतीने तयार करण्यात आलेला तोफगाडा आहे.  वसई गिरिझमधील प्रसिद्ध कलाकार सिक्वेरा बंधूंनी हे काम पूर्ण केले. शिरगाव भागातील कलाकार अक्षय किणी यांनी हा तोफगाडा अभ्यासपूर्ण साकारला आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannon stands again on historic shirgaon fort after 100 year zws