पालघर: पालघर-त्रंबकेश्वर-घोटी-सिन्नर या राष्ट्रीय महामार्गालगत नागरी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे पावसाळ्यात गाड्या सरकून अथवा रस्त्याच्या लगत ठेवलेल्या सामग्रीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून कारवाई करण्याची भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तर्फे घेण्यात आली आहे. पालघर-मनोर-विक्रमगड-जव्हार-त्रंबकेश्वर-घोटी व सिन्नर या १६०-अ या राष्ट्रीय महामार्गावर मनोर, विक्रमगड, जव्हार या शहरांच्या शहरी भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारकांनी सात मीटर रुंदीच्या राष्ट्रीय महामार्गालगत दुकानातील वस्तू ठेवल्या असून काही ठिकाणी मुख्य रस्त्यालगत शेड, टपऱ्या व इतर पक्के बांधकाम केल्याचे दिसून आले आहे.
पावसाळ्यात वाहनांच्या चाकासोबत येणाऱ्या मातीमुळे अनेकदा वाहन सरकून रस्त्याच्या खाली उतरण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे भीषण अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मनोर शहर ते मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग या गजबजलेल्या पट्ट्यात रस्त्यालगत मोठी अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहेत.
यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियता दिनेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता यापूर्वी देखील मनोर नावामध्ये झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध संबंधित नागरिकांना व व्यवस्थापनांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर काही काळ अतिक्रमण दूर करण्यात आले होते. एकीकडे पावसाळ्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण साईडपट्टी मोकळी करण्यासाठी व त्या ठिकाणी भराव करण्यासाठी प्रयत्नशील असताना अशा जागेवर मनोर व जव्हार भागात अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांविरुद्ध नोटीस बजावून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल असे त्यांनी लोकसत्ता ला सांगितले.
नियम काय म्हणतो?
राष्ट्रीय महामार्गाच्या नागरी भागात रस्त्याच्या हद्दीपासून इमारत रेषा ही तीन ते सहा मीटर अंतरावर असून या भागात प्राधिकरणाकडे सात ते १५ मीटर रस्त्याची हद्द राखायची आहे व नागरी भागात महामार्ग रस्त्याची हद्द १२ मीटर इतकी असून रस्त्याच्या मध्यापासून ३७ मीटरवर इमारत रेषा असने अपेक्षित आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वेळोवेळी व नियमितपणे नोट्स बजावून कारवाई करण्याची कृती करीत असल्याची माहिती प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण
मनोर गाव ते मस्तान नाका दरम्यानच्या भागात असणाऱ्या शासकीय व वन विभागाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून या अतिक्रमणधारकांनी आपल्या व्यापारी विक्रीसाठी असणाऱ्या वस्तू रस्त्याच्या कडेला प्रदर्शनीय भागात ठेवले आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचे योग्य प्रकारे दिसून येत नसल्याने मोठ्या वर्दळीच्या रस्त्याच्या या भागात भीषण अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
मासवण व चहाडे येथे देखील रस्त्यावर अतिक्रमण
पालघर व मनोर दरम्यान असणाऱ्या मासवण व चहा डे या गावांच्या नाक्यावर शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून त्यामुळे ही ठिकाणे अपघात प्रवण झाली आहेत. ग्रामपंचायत व महसूल विभागाने अतिक्रमण काढावे ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.