पालघर : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सावधगिरीच्या सूचनांचे अनुपालन करत जिल्ह्यातील सुमारे २०१८ पैकी सर्व मासेमारी बोटी किनारावर आले आहेत. त्यामुळे मच्छिमार बोटींना होणारा संभाव्य धोका टळला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील किनारपट्टीच्या भागांमध्ये तसेच गुजरात मध्ये वादळी वारांसह मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता. २७ व २८ सप्टेंबर रोजी हॉल समुद्रात देखील मुसळधार पाऊस व वादळी वारे वाहण्याची सूचना मच्छिमार संस्थांमार्फत मच्छीमारांना देण्यात आला होत्या. त्या अनुषंगाने मासेमारी बोटीनी समुद्रातून आपल्या बंदरांकडे वाटचाल सुरू केली होती.

पालघर जिल्ह्यात असणाऱ्या मासेमारी बोटींपैकी अर्नाळा बंदरात सुमारे २५० बोटी असून वसई येथे २२५, सातपाटी येथे १९०, धाकटी डहाणू येथे १५०, व मुरवे येथे ३५ मासेमारी रोटी कार्यरत आहेत.

पालघर जिल्ह्यात २०१८ मासेमारी बोटी असून त्यापैकी १८११ मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवाने घेतले होते. वादळी वातावरण निर्माण होण्यापूर्वी पालघर जिल्ह्यातील १५०२ बोटी मासेमारी करण्यासाठी समुद्रात होत्या. या सर्व बोटी परतल्याची माहिती मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकसत्ताला दिली.