पालघर : १९९० च्या दशकापासून बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीमधील शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संभ्रमात पडले आहेत. जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व बंड करणाऱ्या मंडळींची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत ‘वेट अँड वॉच’ धोरणानुसार मौन पाळणार असल्याचे बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्व. आनंद दिघे, उदय पाटील यांच्या पुढाकाराने पालघर जिल्ह्यात शिवसेनेने पाळेमुळे रोवली. १९९५ पासून राजेंद्र गावित यांचा काँग्रेस कार्यकाळ वगळता पालघरमध्ये शिवसेनेचा दबदबा राहिला. तसेच लगतच्या डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा व वाडा या ठिकाणीदेखील शिवसेनेने आपले साम्राज्य प्रस्थापित केले.

पालघर जिल्ह्याच्या स्थापनेपासून शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व प्रभावहीन राहिल्याने येथील शिवसैनिक लहान-मोठय़ा अडचणीला तसेच विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे कार्यालय गाठत. नगर परिषद, नगर पंचायत व इतर स्थानिक निवडणुकींसाठी लागणारी रसद ठाण्याहून पुरवली जात असे. शिवाय एकनाथ शिंदे स्वत: निवडणुकीच्या दरम्यान संबंधित ठिकाणी दौरे करीत असत किंवा तळ ठोकून बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असताना सामान्य शिवसैनिकांचा सेनाभवन व मातोश्रीचा संपर्क औपचारिक कारणापुरताच मर्यादित राहिल्याने शिवसेनेचे पदाधिकारी सेनाभवनाने बोलावलेल्या बैठकींकरिता जात असत. हे पाहता जिल्ह्यातील शिवसेनेची यंत्रणा अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यामार्फतच हाताळली जात होती, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यांना अनेक शिवसैनिक पालकमंत्री असेच संबोधायचे व जिल्हा प्रशासनात त्यांच्या मताचा वेगळा मान असे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून सेनेचे अनेक कार्यकर्ते जिल्ह्यात असून ते सेनेशी एकनिष्ठ आहेत. त्यामुळे शिवसैनिकांची जुनी फळी ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील अशी शक्यता आहे. मात्र अलीकडच्या काळात इतर पक्षांमधून आलेली व ठेकेदारांशी संबंधित मंडळी तसेच निवडणुकीला रसदची मागणी करणारी नगरसेवक मंडळी ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील अशी शक्यता आहे.

या संदर्भात शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ पदाधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून आलेल्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता आपण व आपले सहकारी शिवसैनिक हे संभ्रमावस्थेत असल्याचे सांगून जोपर्यंत वरिष्ठ पातळीवर भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही अशी भूमिका व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य शिवसैनिकांना मातोश्रीबद्दल आत्मीयता असली तरीसुद्धा ठाण्याच्या सुभेदाराने केलेली मदत विसरून चालणार नाही असेदेखील सांगण्यात येते. दरम्यान, शिवसेनेचे कमी प्राबल्य असणाऱ्या डहाणू व तलासरी भागांतील अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याचे दिसून आले आहे.

आमदार श्रीनिवास वनगा यांच्याबद्दल मात्र नाराजी

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर पक्षांतर करून शिवसेनेकडून खासदारकीची पोटनिवडणूक लढवणारे श्रीनिवास वनगा सध्या पालघरचे शिवसेनेतर्फे निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना विजयी करण्यासाठी सर्वसामान्य शिवसेना कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले होते. कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक होते किंवा त्यांना सूचित करणे गरजेचे होते, अशी भूमिका शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. आमदार वनगा मतदारसंघात फिरताना सर्वसामान्य शिवसैनिकांची मदत घेत असताना त्यांच्या भूमिकेबद्दल मात्र शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शिवसेनेच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपले भ्रमणध्वनी बंद ठेवणे पसंत केले असून इतर काही पदाधिकारी व शिवसेनेकडून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे कारण सांगून अधिक वक्तव्य करण्याचे टाळले. खा. राजेंद्र गावित यांनी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट करत शिवसेनेच्या सर्व बैठकींना हजर राहिल्याचे सांगितले.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indicative silence shiv sainiks confusion persists shiv sena incumbent eknath shinde ysh
First published on: 24-06-2022 at 00:02 IST