पालघर: पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, जिल्ह्यात सर्वदूर मध्यम ते जोरदार पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची अंशतः पडझड झाली आहे आणि झाडे उन्मळून पडली आहेत. सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक भागातील वाहतूक खोळंबली आहे.
पालघर जिल्ह्यात काल २७ सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभरापासून विजांचा कळकळाट व ढगांचा गडगडाट मोठ्या प्रमाणात सुरू असून अधून मधून वादळी वारे वाहत आहेत. भारतीय हवामान खात्याने २८ आणि २९ सप्टेंबरसाठी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यातील नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असली तरी, काही ठिकाणी नदीचे पाणी पुलांवरून वाहत असल्याने रस्ते वाहतूक बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत खांब देखील पडले आहेत. विक्रमगड तालुक्यातील शिळ-देहर्जे नदीवरील पुल आणि मनोर रोडवरील पाचतमाड येथील मोरी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक थांबली होती, परंतु आता हे रस्ते पुन्हा सुरू झाले आहेत. वसई तालुक्यातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरांची अंशतः पडझड झाली आहे आणि झाडे उन्मळून पडली आहेत. विक्रमगड तालुका मौजे दादडे येथील बाबुलाल गोंविंद मोहंदकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच सारशी वैजलपाडा येथील मालजी गुण्या नाकरे यांच्या घराचे छप्पर कोसळले आहे. मौजे सुकसाळे (दुमाडपाडा) येथील बंधू लक्ष्मण दुमाडा यांच्या घरावरही झाड पडून अंशतः नुकसान झाले आहे.
पालघर तालुका खरशेत गावात एका घरावर वीज पडल्याने घराला भेग गेली आणि ५ जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जव्हार तालुका मौजे धाधरी येथे वीज पडल्याने एक व्यक्ती जखमी झाली असून घराचेही नुकसान झाले आहे. शिराशी गावात वादळी वाऱ्यामुळे वीजेचा खांब रस्त्यावर पडला आहे, याबाबत संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे.
तलासरी तालुका वडवली डोंगरीपाडा येथे यशंकर बाळू बेंडरे यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे अंशतः नुकसान झाले आहे. डहाणू तालुका मौजे डेहणे खुमरपाडा येथील दिपक गणेश करमोडा यांच्या घराचे वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्याने अंशतः नुकसान झाले आहे.
प्रशासनाकडून मदतीचे आवाहन
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना घाबरून न जाता सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्याशी समन्वय साधून मदत आणि बचाव कार्याची तयारी करण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधा
कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नागरिकांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी ०२५२५- २९७४७४ किंवा +९१८२३७९७८८७३ या क्रमांकावर, अथवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
धरणे भरली, विसर्ग वाढला
जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोडकसागर धरणा मधून ६२,२६७ क्युसेक लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर तानसा धरण ४१,९९९.८८ क्युसेक लिटर, सूर्य धरणातील १०,६२९ क्युसेक लिटर व मध्य वैतरणा धरणातून २२,४२५ क्युसेक लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.