पालघर : प्रवाशांना भेडसावणाऱ्या दैनंदिन समस्या, तक्रारी व सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यातील प्रत्येक आगारात १० सप्टेंबर १० डिसेंबर पर्यंत दर बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येत आहे. या प्रवासी राजा दिनी संबंधित आगारामध्ये प्रवाशांनी आपल्या समस्या, तक्रारी व सूचना मांडण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील पालघर, सफाळा, वसई, अर्नाळा, डहाणू, जव्हार, बोईसर व नालासोपारा या आगारांमध्ये जवळपास ४१० बस कार्यरत आहेत. एसटीच्या विविध बस मधून दररोज जवळपास ५० लाखहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. या बस मधून दैनंदिन प्रवास करणारे कामगारवर्ग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना बसने प्रवास करतांना अनेक समस्या उद्भवत असतात. त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
१० सप्टेंबर पासून सर्वत्र सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेमध्ये प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा – महाविद्यालये आपल्या समस्या-तक्रारी, सुचना लेखी स्वरूपात दर बुधवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत मांडू शकतात. तसेच त्यानंतर त्याच दिवशी संबंधित आगारात दुपारी तीन ते पाच या वेळेत कामगार दिन साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन दिनी एसटीचे विभाग नियंत्रक एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे एसटी विभाग विभागाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवासी राजा दिन कोणत्या दिवशी कोणत्या आगारात होणार आहे, याचे वेळापत्रक विभाग नियंत्रक यांच्याकडून जाहीर करण्यात आले असून राज्य परिवहन आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार असून या वेळेत संघटना व राज्य परिवहन कर्मचा-यांच्या वैयक्तीक बाबतीतील प्रश्न रजा मंजुरी, कर्तव्यासंबधी, वेळापत्रकासंबधी व कारवाई बाबत तक्रारी लेखी स्वरुपात घेऊन तक्रारीचे तात्काळ निराकरण करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
या उपक्रमाव्दारे प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या बस स्थानकातील समस्या
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप नसतात तसेच एसटी बसेस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ होत नाहीत, ठरलेले थांबे अनेकदा घेतले जात नाही, चालक-वाहक यांची मुजोरी सामान्य नागरिकांना अनेकदा पहावी लागते, चालक वाहक यांनी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते.
यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने व्हावे, प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रवाशांच्या समस्यांचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक असते. तसे झाल्यास प्रवाशांना समाधानकारक सेवा देणे एसटी महामंडळाला शक्य होणार आहे.
तक्ता
आगार – तारीख
- अर्नाळा – १० सप्टेंबर व १२ नोव्हेंबर
- बोईसर – १७ सप्टेंबर व ३ डिसेंबर
- नालासोपारा – २४ सप्टेंबर व १० डिसेंबर
- जव्हार – १ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर
- पालघर – १० ऑक्टोबर
- सफाळे – १५ ऑक्टोबर
- वसई – २९ ऑक्टोबर
- डहाणू – २६ नोव्हेंबर