पालघर : पालघर शहराला मुख्यालयाचे शहर म्हणून ओळख असली तरीही मुख्यालयाकडे जाणाऱ्या पालघर-बोईसर रस्त्यासह पालघर, मनोर, माहीम अशा मुख्य राष्ट्रीय व राज्य मार्गाची ठीकठिकाणी चाळण झाली आहे. मागील आठवड्या अखेरीस झालेल्या संततधार पावसामुळे खोल खड्डे पडले आहेत. गणेशाचे आगमन आठवड्याभरावर आले असताना या मार्गावरून गणेशोत्सवाची मिरवणूक करताना मंडळासमोर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर गणेशाच्या आगमनाच्या अगोदरच या रस्त्यांची डागडुजी करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे.
पालघर बोईसर रस्ता पालघर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक कार्यालय, तीन शाळा, दोन महाविद्यालये आणि औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज हजारो प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची ये-जा असते. मात्र या महत्त्वाच्या रस्त्याकडेच प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सुरू होणाऱ्या या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. हे रस्ते प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक बनले असून, नागरिक संतप्त झाले आहेत.
पालघर शहरातील बोईसर, मनोर, माहीम यांसारख्या प्रमुख ठिकाणांकडे जाणारे रस्ते तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, हुतात्मा चौक तसेच सेंट जॉन महाविद्यालयाजवळील रस्ता ही ठिकाणे खड्ड्यांमुळे धोकादायक बनली आहेत. त्यामुळे दैनंदिन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रत्येक पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी खर्च केलेला कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे जातो, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. यावर्षी पावसाळ्यापूर्वी बुजवलेले खड्डे पहिल्याच पावसात उखडले. त्यानंतर मागील महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून गोठणपूर नाक्यापर्यंत खड्डे बुजविण्यासाठी टाकलेली खडी आणि दगड रस्त्यावर पसरल्याने वाहने घसरण्याचे प्रकार वाढले. आता पुन्हा खड्डे उघडे पडले असून परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
मंडळांच्या मोठमोठ्याला गणरायांची मिरवणूक या मुख्य रस्त्यांवरून वाजत गाजत निघत असते. मात्र अशावेळी रस्त्यातील मोठमोठाल्य खड्ड्यांमुळे मिरवणुकी दरम्यान अडथळा येतो. अशावेळी मूर्ती भंगण्याच्या देखील घटना घडत असतात व यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. याला एकमेव कारण प्रशासन असून याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व बांधकाम विभागांना संपर्क करून देखील लवकरच रस्ते दुरुस्त करण्यात येणार असल्याचे एकमेव उत्तर समोर येत असते.
नागरिकांचे हाल, प्रशासन मूग गिळून गप्प
रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. कंबरदुखी आणि वाहनांचे नुकसान अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. प्रशासकीय अधिकारी, नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलून स्वतःची जबाबदारी झटकत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या त्रासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते.
नागरिकांची मागणी
पादचाऱ्यांसाठी पदपथ नसल्यामुळे त्यांना रस्त्याच्या कडेने चालावे लागते आणि वाहनांमुळे त्यांच्या अंगावर चिखल उडतो. जोपर्यंत एखादा मोठा अपघात होऊन कुणी गंभीर जखमी होत नाही किंवा कुणाचा मृत्यू होत नाही, तोपर्यंत प्रशासन जागे होणार नाही का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.