बोईसर : पालघर तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची अक्षरक्ष बिकट अवस्था झाली आहे. पावसाळ्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील रस्ते देखील खड्ड्यात गेले असून यामुळे नागरिकांना प्रवास करतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात पालघर तालुका पूर्व रस्ते संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. वारंवार तक्रारी करून देखील रस्त्यांची अवस्था सुधारत नसल्याने तसेच रस्त्यांच्या कामांमध्ये गैरव्यवहार करणारे अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरोधात कारवाई होत नसल्याने या विरोधात आंदोलनासोबतच न्यायालयीन लढा देण्याचा निश्चय केला आहे.
पालघर तालुक्यातील प्रमुख राज्यमार्गासह जिल्हामार्ग व ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसानंतर या रस्त्यांच्या दुरवस्थेमध्ये अधिकच भर पडली आहे. पालघर आणि बोईसर या शहरी भागा सोबतच तारापूर एमआयडीसी ला जोडणारा बोईसर चिल्हार रस्ता, मनोर-वाडा, मनोर-केव फाटा, गुंदले-चहाडे, नागझरी-मासवन, चहाडे-तांदुळवाडी, नागझरी-किराट, वेळगाव -मनोर, सोमटा-भोपोली या दळणवळण अधिक असलेल्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या आकाराच्या खड्ड्यांसोबतच डांबराचा थर वाहून जाऊन रस्त्यावरील खडी बाहेर आली आहे.
खड्डेमय रस्त्यातून वाहन चालवताना वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत असून अपघातांसोबतच शारीरिक आणि मानसिक त्रास तसेच वाहनांचे नुकसान नागरिकांना सहन करावे लागत आहे. नागझरी ते किराट या रस्त्याचे जून महिन्यात डांबरीकरण करण्यात आले. डांबरीकरण सुरू असताना रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. मात्र नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच पावसामुळे हा रस्ता उखडला.
अधिकारी-कंत्राटदारांवर गैरव्यवहाराचे आरोप
नवीन रस्त्यांची कामे तसेच देखभाल दुरुस्ती करताना कंत्राटदारांकडून अंदाजपत्रकाप्रमाणे कामे केली जात नाहीत. कामाचा दर्जा व गुणवत्ता राखली जात नसल्यामुळे काही दिवसातच रस्त्याची दुरावस्था होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार हे रस्त्याच्या कामात संगनमताने गैरव्यवहार करीत असून रस्ते कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करणे.
नागझरी – किराट रस्त्याचे काम नव्याने लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. चहाडे- तांदुळवाडी रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित ठेकेदार ह्यांच्यावर करवाई करावी. नागझरी -मासवन रस्त्यावरील तसेच तांदुळवाडी -वरई रस्ता आणि पारगाव पुलावरील खड्डे तात्काळ भरावेत या प्रमुख मागण्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र कीणी यांची भेट घेऊन करण्यात आली. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई न केल्यास आंदोलनासोबतच न्यायालयीन लढा देण्याचा इशारा यावेळी संघर्ष समिती मार्फत देण्यात आला.
पालघर तालुका पूर्व संघर्ष समिती तर्फे तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था व कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करून अहवाल मागविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खड्डेमय रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येईल. – महेंद्र कीणी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर