पालघर: पालघर शहरात पावसाच्या सुरुवातीपासूनच ठीक ठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. याबाबत नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया प्राप्त होत आहे तर अनेक नागरिक आंदोलन करून व समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देऊन आपला रोष व्यक्त करीत आहेत. नागरिकांच्या या टिकेनंतर प्रशासनाने ‘खड्डे भरणी’चा देखावा सुरू केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. असे असले तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपरिषदेच्या हद्दीमुळे रस्त्याची कामे खोळंबत असल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुचाकीस्वारांना गंभीर दुखापती होत आहेत, तर वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. मात्र या सर्व गंभीर परिस्थितीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी समाज माध्यमांवर आणि रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अखेर प्रशासनाने या टीकेनंतर ‘खड्डे भरणी’ सुरू केली आहे. मात्र पाणी साचलेल्या खड्ड्यांमध्येच खडी व सिमेंट मिश्रित मिश्रण टाकले जात असल्याने तो भराव मागून येणारा गाडीच्या चाकाखाली येऊन पुन्हा स्थिती पूर्ववत होत असल्याने या खड्डे भरणीचा देखावा प्रशासन का करत आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गेल्या आठवड्यात पालघरमधील हुतात्मा चौकात नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध केला. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेसाठी करदात्यांच्या पैशातून होणारा भ्रष्टाचार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला.

सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषदेच्या हस्तांतरणामुळे घोळ

पालघर रेल्वे स्टेशन पासून वळण नाका पर्यंतचा माहीम मार्ग तसेच रेल्वे स्थानकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंतचा मनोर मार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. बायपास मार्ग उपलब्ध झाल्यानंतर शहरांमधून व रेल्वे स्थानकाजवळ जाणाऱ्या राज्य मार्गाचा दर्जा कमी करण्यात आला. त्यामुळे शहरातील दोन प्रमुख रस्ते व इतर रस्त्यांचे पालघर नगर परिषदेकडे हस्तांतर करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्याप हे हस्तांतरण झाले नसले तरीही खड्डेभरणी बाबत सार्वजनिक बांधकाम विभाग निष्काळजीपणा करत असल्याचे दिसून येत आहे. हस्तांतरणानंतर नगरपरिषद हद्दीतील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण व देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी नगरपरिषद वर येऊन ठेपणार आहे.

दिखावा की ठोस उपाययोजना?

प्रशासन खड्डे भरण्याचे काम सुरू असल्याचे दाखवत असले, तरी हा केवळ एक दिखावा आहे. खड्ड्यांमध्ये खडी आणि सिमेंट मिश्रित साहित्य टाकले जात आहे. मात्र यातून वाहन गेल्यावर परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ, केवळ वरवरचा मलमपट्टी केली जात असून, ही ‘खड्डे भरणी’ पावसामुळे टिकत नसल्याचे पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम राऊत यांचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावरील टीकेची धार

पालघरमधील स्थानिक रहिवासी आणि रील स्टार सिद्धांत घरत याने शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांवर एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर देखील नागरिक सातत्याने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक स्टेटसवर उपरोधिक कविता, पोस्ट टाकून प्रशासनाची खिल्ली उडवत आहेत. यातून प्रशासनाबद्दलचा लोकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे.

‘इतर ठिकाणच्या तुलनेत इथे खड्डे मोठे नाहीत,’ असा दावा?

स्थानिक माजी लोकप्रतिनिधी आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांना हे खड्डे इतर ठिकाणच्या तुलनेत मोठे वाटत नसल्याची चर्चा आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणखीनच संताप वाढला आहे. “खड्डे भरण्याच्या नावाखाली प्रशासन आमच्या जखमांवर मीठ चोळत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. या दिखाऊ उपायांमुळे प्रशासनाची प्रतिमा आणखीनच खराब होत असून, पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांवर योग्य उपाययोजना न केल्याचा फटका आता प्रशासनाला बसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सातत्याने सुरू असल्याने खड्डे भरणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे तात्पुरते खडी टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. पालघर नगर परिषद मधील काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून या रस्त्यांच्या हस्तांतरणाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. तरीदेखील पावसाने उघडीप घेतल्यानंतर डांबराचा थर व मिश्रण टाकून रस्ते दुरुस्त करण्यात येतील. – नानासाहेब कामठे, मुख्याधिकारी पालघर नगरपरिषद