पालघर : कोकण आपत्ती सौमीकरण योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यालगतच्या तीन किलोमीटर परिघातील गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामे निविदा अंतिम होण्याच्या स्थितीत प्रकल्प आहे. पाऊस थांबल्यानंतर या कामाला आरंभ होणार असून आगामी १८ महिन्यात हे काम पूर्ण होण्यासाठीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

कोकण आपत्ती सौमीकरण प्रकल्पांतर्गत भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामासाठी २४ जानेवारी २०२४ रोजी शासन निर्णय मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या निविदा या निविदा रकमेच्या सुमारे ३० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने त्या रद्द करून फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत.

या उपक्रमात पालघर, बोईसर, डहाणू व सफाळा या उपविभागांमध्ये सुमारे ६२५ किलोमीटर लघुदाबाची (लो टेन्शन) विद्युत वाहिनी व ३२५ किलोमीटर लांबीची उच्च दाब वाहिनी (हाय टेन्शन) भूमिगत केबल टाकण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या कामी प्राप्त निविदेमधून किमान खर्चात काम करण्यासाठी तयार असणाऱ्या कोकण रेल्वे या कंपनीला निविदा देण्याच्या दृष्टीने प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून माहिती पुढे आली आहे.

१५ व्या वित्त आयोगाने राज्यासाठी राज्य आपत्ती सौमीकरण निधी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारने निश्चित केलेल्या आपत्ती सौमीकरण करण्यासाठी सन २०२१-२२ ते सन २०२५-२६ अशा पाच वर्षासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीच्या वापरासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभाग व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयात कामाची कार्यपद्धती व अटी व शर्ती नमूद करण्यात आल्या असून निविदा अंतिम झाल्यानंतर या कामाला आरंभ होण्याची शक्यता आहे.

उपविभाग निहाय मंजुरी निधी

पालघर : ३३.७५ कोटी

डहाणू : ५७.२० कोटी

सफाळे: ४९.२४ कोटी

बोईसर: ५९.६६ कोटी

या योजनेत सहभागी केलेली गावे

पालघर जिल्ह्याला नायगाव ते तलासरी दरम्यान १२७ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा किनारपट्टी लाभला आहे. पालघर सर्कल अंतर्गत वैतरणा ते तलासरी पर्यंत सुमारे ८० किमी अंतरावर किनारपट्टी आहे. त्यामुळे पालघर सर्कल अंतर्गत येणारा भाग चक्रीवादळाचा धोका निर्माण करतो. पालघर जिल्ह्याने २०२१ मध्ये अनुभवलेले शेवटचे चक्रीवादळ “तौक्त” हे पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात विशेषतः खाली नमूद केलेल्या गावांवर विनाशकारी परिणाम करणारे होते.

तालुका निहाय गावांची नाव

डहाणू : बोर्डी, झाई, बोरीगाव, घोलवड, नरपड, डहाणूगाव, चिखले, आंबेमोरा, खाडीपाडा, बागपाडा, चिंचणी, वरोर वाढवण, धुमकेत, अब्राहम, गुंगवाडा, ताडियाले, धाकटी डहाणू

पालघर : वडराई, शिरगाव, दातीवरे, खर्डी, केळवा, कोरे, डोंगरे, एडवण, उसर्णी, दांडा-खटाळी, मुरबे, नांदगाव, आलेवाडी, नवापूर, दांडी, उणभाट, उच्छेळी, घिवली, कंबोडा, मथाणे, भाताणे

नवीन विभाग स्थापन करण्यासाठी प्रस्ताव

महावितरण कंपनीच्या पालघर विभागामध्ये जिल्ह्यातील वाडा व वसई तालुका व्यतिरिक्त इतर सर्व सहा तालुके येत असून या विभागाची व्याप्ती पाहता त्याची विभागणी करण्यासाठी प्रस्ताव करण्यात आले आहेत. यापूर्वी वाडा या नव्या विभागाचा प्रस्ताव करून त्यामध्ये विक्रमगड, वाडा, जव्हार, मोखाडा या तालुक्यांचा समावेश करण्याचे विचाराधीन होते. मात्र या प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली नव्हती. पालघर सोबत डहाणू येथे नव्याने महावितरण कंपनीचे विभागीय कार्यालय स्थापन करून या नव्याने प्रस्तावित विभागात डहाणू, तलासरी, जव्हार व मोखाडा या चार तालुक्यांचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास महावितरण कंपनीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधिक दर्जेदार सेवा पुरवण्यास उपयुक्त ठरू शकेल.