डहाणू : हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर डहाणू परिसरात मुसळधार पाऊस सुरू झाला. याच पावसामुळे रविवार २८ सप्टेंबर रोजी रात्री रात्री ७.३० ते ८.०० दरम्यान डहाणू तालुक्यातील चरी गावाजवळ नदीकाठावरील रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहात एक खासगी बस अडकली.

या बसमध्ये चालकासह १६ महिला प्रवासी, असे एकूण १७ जण होते आणि मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वानगावकडून आशागडकडे निघालेली ही बस सावटा येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने परत पाठवण्यात आली होती. मात्र, बसचालकाने पर्यायी मार्गाचा निवडण्याचा प्रयत्न केला असता, चरी येथे पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बस गुडघाभर पाण्यात अडकली.

बस अडकल्याची माहिती मिळताच तात्काळ तालुका, जिल्हा प्रशासन, डहाणू नगरपरिषद आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे, तहसीलदार सुनील कोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता नितीन पगारे यांच्यासह विविध यंत्रणा आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. प्रशासनाच्या वेळेत हाती घेतलेल्या प्रयत्नांमुळे आणि स्थानिकांच्या मदतीने प्रसंगावधान राखत, अडकलेल्या सर्व प्रवाशांना रात्री ९.३० पर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात आले. बचावकार्यादरम्यान डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार जखमी झाले आहेत.

बचाव करण्यात आलेल्या सर्व १७ प्रवाशांना तातडीने डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक तपासणी आणि उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्वजण सुरक्षित असून मोठी दुर्घटना टळली आहे. वेळेत हाती घेतलेले प्रशासनाचे प्रयत्न आणि जिल्हा यंत्रणांची समन्वयात्मक कामगिरीमुळे १७ जणांचे प्राण वाचले. या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.