पालघर : माहीम ग्रामपंचायत हद्दीमधून वाहणाऱ्या पाणेरी ओहोळात औद्योगिक आस्थापनांकडून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यावर आळा घालण्यासाठी तसेच त्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्यासाठी माहीम ग्रामपंचायतीने २१ ऑगस्ट रोजी प्रदूषण करणाऱ्या उद्योगांसमवेत बैठकीचे आयोजन केले आहे.
पाणेरी ओहळामुळे परिसरातील शेती बागायतदारांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी मिळत असून हे पाणी नंतर खाडी मधून समुद्राला मिळते. काही उद्योगाने प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्याचा प्रकार गेल्या १०-१५ वर्षांपासून सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना व मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
महिनाभरापूर्वी एका वस्त्रोद्योग कंपनीने बायपास लाईनद्वारे प्रदूषित पाणी ओहोळमध्ये जाणाऱ्या नाल्यात सोडत असताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर अति प्रदूषणकारी (रेड कॅटेगरी) मधील उद्योगांची यादी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तारापूर कार्यालयाकडून घेऊन संबंधित कारखाना मालक अथवा उच्चपदीय व्यवस्थापकीय अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन २१ ऑगस्ट रोजी माहीम बाजार शेडमध्ये केले आहे. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या परवानगीमध्ये नमूद असलेल्या परवानगींची माहिती घेऊन त्यांच्यामार्फत राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा होणार आहे. तसेच या उद्योगांच्या मदतीने प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले असून या बैठकीला पालघरचे आमदार राजेंद्र गावित तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित राहतील असे माहीमच्या सरपंच प्रीती पाटील यांनी लोकसत्ताला सांगितले.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ पाहणार असून या पार्श्वभूमीवर पाणेरी ओहोळाची प्रदूषणाची समस्या पुन्हा पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दोन उद्योगांचे नमुने तपासणीला
एका वस्त्रोद्योग कंपनीकडून प्रदूषित सांडपाणी बायपास लाईनद्वारे उघड्यावर सोडले जात असल्याचे माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी रंगेहात पकडल्यानंतर त्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले आहेत. एवायएम सिंटेक्स या कंपनीच्या वाहिनीतून घेतलेल्या नमुन्यांचे पृथकरण निकाल प्रदूषण नियंत्रणाच्या मर्यादेचे उल्लंघन करत असल्याने या कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी वीरेंद्र सिंग यांनी लोकसत्ता ला सांगितले. तर मेडिको रेमिडीस या कंपनीकडून प्राप्त केलेल्या नमुन्यांच्या निकालाचे पृथकरण अहवाल प्राप्त होणे प्रलंबित असून या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती त्यांनी दिली.