पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार या तीन नगरपरिषद आणि वाडा या एका नगरपंचायतीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मंगळवारी या चारही निवडणुकांसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या ४ जागांसाठी २४ तर नगरसेवक पदाच्या ९४ जागांसाठी ३५४ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत.

पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी १२ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी २ अर्ज अवैध ठरले. छाननीनंतर १० अर्ज वैध ठरले, परंतु दोन अर्ज अतिरिक्त असल्याने या पदासाठी आठ उमेदवार निवडणुकीत शिल्लक राहिले आहेत. १५ प्रभागांच्या ३० नगरसेवक पदासाठीच्या एकूण १७२ नामनिर्देशन पत्रापैकी ३३ नामनिर्देशन पत्र अवैध ठरली असून १३६ नामनिर्देशन पत्र वैध ठरली आहेत.

डहाणू नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त झालेले चारही अर्ज वैध ठरले आहेत. तर १३ प्रभागांच्या २६ जागेकरिता ८३ नामनिर्देश पत्र प्राप्त झाले होते त्यापैकी ७२ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

जव्हार नगरपरिषदेकरिता नगराध्यक्ष पदासाठी ८ नामनिर्देश पत्र प्राप्त झाले होते. त्यापैकी पाच पत्र वैध ठरविण्यात आले आहेत. तर १० प्रभागांच्या २० जागेकरिता ११० नामनिर्देश पत्र प्राप्त झाले होते त्यापैकी ७४ वैध ठरविण्यात आले आहेत.

यासह वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाकरिता १० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ७ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर १७ प्रभागांच्या १७ नगरसेवक पदाकरिता १०१ अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी छाननी नंतर ७४ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

आक्षेपांवर निर्णय बाकी

पालघर नगरपरिषदेमध्ये तीन सदस्यांच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. शिंदे सेना पक्षाचे उमेदवार रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे यांच्याविरोधात उबाठा गटाचे उमेदवार अरीफ कलाडिया यांनी, तर शिंदे सेनेचे उमेदवार सुभाष पाटील यांच्याविरोधात उबाठा गटाचे उमेदवार राहुल पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच, भाजपचे मुनाफ मेनन यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार राजेश घुडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी श्याम मदनुरकर यांनी सांगितले की, या तीनही आक्षेपांवर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले असून, त्यावर निर्णय देणे बाकी आहे.

२६ नोव्हेंबरला अंतिम यादी

अर्ज मागे घेण्याची मुदत अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबर पर्यंत, तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबर पर्यंत आहे. उमेदवारांची अंतिम यादी, निवडणूक चिन्ह आणि निवडणुकीचे चित्र २६ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. या चारही ठिकाणी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.