पालघर : सणासुदीच्या काळात काही समाजकंटकांच्या गैरकृत्यामुळे धार्मिक सणाला गालबोट लागत असल्याने गणेशोत्सव काळात कोणत्याही धर्माचा अपमान होणार नाही अशा प्रकारे जातीय सलोखा राखत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी गणेशोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय समन्वय बैठक दरम्यान केले. तसेच ईद-ए-मिलाद व अनंत चतुर्दशी निमित्त निघणाऱ्या मिरवणुका दरम्यान विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी पोलीस पाटील व मंडळांना केले आहे.

पालघर जिल्हा गणेशोत्सव २०२५ ची जिल्हास्तरीय समन्वय समिती बैठक १४ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या बैठकीला आमदार राजेंद्र गावित, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस पाटील, शांतता कमिटी व मोहल्ला समितीचे पदाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात १६ पोलीस ठाण्यांतर्गत १९१२ सार्वजनिक व ९७७६ खाजगी गणेशोत्सव तर १४१ सार्वजनिक व ६०४ खाजगी गौरीची स्थापना होणार आहे.

गणेशोत्सवा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक नियंत्रण, धार्मिक वाद, गर्दी व्यवस्थापन, रस्त्याची परिस्थिती, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, ध्वनिक्षेपकवरील निर्बंध, प्रसादातून विषबाधा, पर्यावरण व सामाजिक देखावे, सीसीटीव्ही कॅमेरे, निर्माल्याची विल्हेवाट, घाट व समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

हिंदू बांधवांचा गणेशोत्सव आणि मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हे सण एकत्र येत असताना काही वेळा समाजकंटकांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. अशावेळी पोलिसांनी व मंडळांनी विशेष काळजी घेऊन मुस्लिम बांधवांची मिरवणूक गणेश मंडळासमोर आल्यावर शांतता राखावी तर गणेश विसर्जनाची मिरवणूक मज्जिद समोर आल्यावर शांतता राखून गुलाल उधळू नये व धार्मिक भावनांचा सन्मान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या बैठकीत केले.

गणेशोत्सव काळात व इतर वेळी अनेकदा वीज प्रवाह खंडित हो असल्याने उत्सवा दरम्यान अडचणी येत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्यावर अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे यांनी भार नियमनचा कालावधी सोडून इतर वेळी वीजप्रवाह खंडित होणार नाही याची महावितरणने काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच घाटावर व समुद्रकिनारी विसर्जनानंतर स्वच्छता राखली जाईल याकडे लक्ष देण्याचे देखील सांगितले.

प्रसादामधून विषबाधा होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने प्रसादाची योग्य ती तपासणी करावी व भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन आमदार राजेंद्र गावित यांनी यावेळी केले. तसेच विसर्जनाच्या दिवशी दारूबंदी ठेवावी व क्राईम विना उत्सव कसा साजरा होईल याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.

राष्ट्रभक्तीच्या देखाव्यांकडे विशेष भर द्यावा

हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होणार नाही असे देखावे मंडळांनी तयार करावे. तसेच सैनिकांच्या कामगिरीवर ऑपरेशन सिंदूर सारखे देखावे सादर करून जवानांना आदरांजली द्यावी. तर स्वदेशीचा नारा कसा देता येईल याकडे मंडळांनी विशेष लक्ष देऊन देखावे तयार करण्याचे आवाहन यतीश देशमुख यांनी यावेळी केले.

डीजेची परवानगी घेणे आवश्यक

मंडळांकडून वाजविण्यात येणाऱ्या ध्वनिषकावर मर्यादा ठेवण्यात आल्या असून दुसऱ्या, पाचव्या व अकराव्या दिवशी ध्वनिक्षेपक रात्री बारा वाजेपर्यंत वापरायची अनुमती असून इतर दिवशी दहा वाजता पर्यंत ध्वनिक्षेपक बंद करण्यात यावे. तसेच मंडळांनी याकरिता विशेष परवानगी अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात देऊन नियमांच्या अधीन राहून सण उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

दारूबंदी बाबत प्रयत्नशील राहू

महात्मा गांधी जयंतीला ड्रायडे पाळला जातो त्याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या दरम्यान महत्त्वाच्या दिवशी दारूबंदी ठेवायला हरकत नसल्याचे राजेंद्र गावित यांनी पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. दारूचा वापर कसा बंद करता येईल याबाबत आम्ही प्रयत्नशील असून मंडळांनी व इतर भाविकांनी देखील याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन यावी करण्यात आले.

इतर महत्त्वाचे निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या पातळीवर कृत्रिम तलाव निर्माण करून लहान मूर्ती विसर्जन करता येईल याकडे लक्ष द्यावे.

पर्यावरण, सामाजिक व ध्वनी प्रदूषण या निकषांवर दरवर्षीप्रमाणे १६ पोलीस ठाण्यांतर्गत तीन उत्कृष्ट मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

मंडळांना अधिकचा वीज पुरवठा लागणार असल्याबाबतचे पत्र त्यांनी महावितरणकडे सुपूर्द केल्यास अचानक दाब येणार नाही याची दक्षता घेऊन महावितरण त्याप्रमाणे पूर्वतयारी करू शकेल व वीज पुरवठा खंडित होणार नाही.

जिल्ह्यात 90 गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात येत असून सर्वाधिक वाडा तालुक्यात 35 ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येतो. 15 ऑगस्ट च्या ग्रामसभेत याबाबत निर्णय घ्यावा.

उत्सवा दरम्यान तयार होणारे निर्माल्य जमा करून त्याचे खतात रूपांतर करून त्याचा कचरा न करता शेतीसाठी पूरक ठरेल असा वापर करावा.

विसर्जनानंतर घाटावरील व समुद्रकिनाऱ्यावरील पीओपी मुर्त्यांना एकत्रित करून त्यांची योग्य ती काळजी घ्यावी.