पालघर: नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, भाविकांना महाराष्ट्रातील प्रमुख देवींच्या मंदिरांचे दर्शन घेता यावे यासाठी पालघर आगराने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. एसटी महामंडळाने प्रथमच पालघरमधून थेट देवीच्या दर्शनासाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे. यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होणार असून एसटीच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
२२ सप्टेंबरपासून या विशेष बस सेवा सुरू होणार आहेत. या बस सेवा वणी (सप्तशृंगी गड), चांदवड (रेणुकामाता), कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर), तुळजापूर (तुळजाभवानी) आणि माहूरगड (रेणुकामाता) या प्रमुख मंदिरांकडे जाणार आहेत. या सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना घटस्थापनेपूर्वी आगाऊ बुकिंग करण्याचे आवाहन पालघर आगार प्रमुख सुजित घोरपडे यांनी केले आहे.
पालघर एसटी प्रशासनाने या बस सेवेसाठी समूह बुकिंगवर भर दिला आहे. पालघर तालुक्यातील केळवा, माहीम, सातपाटी, शिरगाव, खारेकुरण आणि इतर गावांतून देखील ग्रुप बुकिंग उपलब्ध आहे. ज्या गावातून मागणी येईल, त्या गावातून थेट बस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी एकत्रितपणे आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधून बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे प्रवासादरम्यान होणारी गर्दी टाळता येईल आणि प्रवाशांना थेट त्यांच्या गावापासून देवीच्या दर्शनासाठी जाता येईल.
सर्व सवलती लागू
या विशेष बस सेवेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या सर्व सवलती लागू असतील. यामध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना तिकिटावर ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास आणि ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर सवलत मिळेल. परतीच्या प्रवासासाठीही ग्रुप बुकिंग सुरू असून, भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे घोरपडे यांनी सांगितले.
उत्पन्न वाढीसाठी नवा प्रयत्न
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एसटी महामंडळाला पॅकेज टूरमधून चांगला महसूल मिळाला आहे. याच धर्तीवर पालघर विभागाने कमी गर्दीच्या हंगामात आणि सणासुदीच्या काळात उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी अशा विशेष टूरच्या आयोजनावर भर दिला आहे. यापूर्वी, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेला आणि श्रावण महिन्यात अष्टविनायक दर्शनासाठी विशेष गाड्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसोबतच एसटीचे उत्पन्न वाढण्यासही मदत झाली आहे.
ठिकाण – अंतर (किमी) – भाडे
पालघर – वणी (सप्तशृंगी गड)- पालघर – ५२० – ८७५
पालघर – रेणुकामाता (चांदवड) – पालघर – ४८० – ८०५
पालघर – वणी – चांदवड – पालघर – ६०० – १००६
पालघर – कोल्हापूर (महालक्ष्मी मंदिर) – पालघर – १०२० – १७११
पालघर – तुळजापूर (तुळजाभवानी) – पालघर – ११४० – १९१२
पालघर – माहूरगड (रेणुकामाता) – पालघर – १४८० – २४८५