पालघर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकीय पुढार्‍यांकडून ‘लाडक्या बहिणीसाठी’ नवदुर्गा दर्शन एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आल्या आहेत. काही आयोजकांनी आधारकार्ड व निवडणूक ओळखपत्रांची झेरॉक्स या नवदुर्गा दर्शन सोहळ्यासाठी अनिवार्य करण्यात आले असून निवडणुकीसाठी आपल्या क्षेत्रातील मतदारांना प्रलोभित करण्यास आरंभ झाला आहे.

नवरात्री दरम्यान पालघर शहरातून दररोज ५० ते ६० मोठ्या बस गाड्या नवदुर्गा दर्शना निमित्ताने कार्यरत राहिल्याचे दिसून आले असून यामुळे जिल्ह्यातील विविध देवस्थांमध्ये लक्झरी बसच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

जिल्हा परिषद – पंचायत समिती, महानगरपालिका – नगरपरिषदा यांच्या येणार्‍या काही महिन्यात होणार्‍या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमधील इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रभागातील महिलांचे नवदुर्गादर्शन आयोजित करत असून अनेक महिलांनी या विनामूल्य देवी दर्शनाचा लाभ घेतला आहे. पालघर शहरात एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांने प्रभागावर बससेवांचे नियोजन केल्याचे दिसून आले आहे.

जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी देवी, श्री शितलादेवी, श्री जिवदानी देवी, श्री संतोषीमाता मंदिर व लगतच्या भागातील श्री वजेश्वरी देवी यांच्या देवळामध्ये भाविकांची गर्दी होत आहे. विरार-वसईपासून डहाणूपर्यंत नऊ देवींच्या दर्शनाची आखणी करून भाविक महिलांना सोयीस्कर ठरेल असा सफाळे, केळवे, माहीम, तारापूर, डहाणू भागात देवींच्या मंदिरात दर्शनासाठी दौरा आखला जातो. या दर्शन दौर्‍या दरम्यान नाश्ता, जेवण आणि चहापान – अल्पोहराचे नियोजन करण्यात येते. या दौर्‍यासाठी बसभाडे सुमारे 15 हजार आणि नाश्ता जेवणासाठी 10 हजार रुपयांचा असा एका बसचा 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च होतो.

पालघर नगरपरिषद क्षेत्रात एका राजकीय पक्षाने दररोज ५० पेक्षा अधिक बस फेर्‍यांचे नियोजन केले असून इतर राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी देखील अशा प्रकारच्या फेर्‍यांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकासाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्ह्याच्या विविध भागात नवदुर्गा दर्शनाच्या दौर्‍याचे आयोजन केले आहे.

वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातून पालघर ते डहाणू तालुक्यात देवी दर्शनासाठी मोठ्या संख्येने बसेस यावर्षी उपस्थिती दर्शविली जात आहे. महिला वर्गाला खूप ठेवताना त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती तसेच कुटुंबातील इतर मतदारांची माहिती संकलित केली जात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणींसाठी नवदुर्गा दर्शनाच्या पर्वणी चे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.