पालघर : पालघर जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक अत्यंत धोकादायक पद्धतीने होत असून सार्वजनिक वाहतूक आणि खासगी वाहनांची दयनीय अवस्था चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालत आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून होणारा प्रवास, खराब वाहने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालक वारंवार तक्रारी करत असले तरी पोलीस, एसटी आणि शालेय प्रशासन या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा घर ते शाळा आणि शाळा ते घर असा दररोजचा प्रवास हा जीवघेणा ठरत आहे. बस, रिक्षा किंवा खासगी व्हॅन असो प्रत्येक वाहनात क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून भरले जातात. तीनचाकी रिक्षा आणि चारचाकी डमडमसारख्या गाड्यांना बंदिस्त दरवाजे नसतात, ज्यामुळे विद्यार्थी एकमेकांच्या मांडीवर बसून किंवा एकमेकांना धक्काबुक्की करत प्रवास करतात. अशा परिस्थितीत खिडकीतून बाहेर वाकल्यास किंवा तोल गेल्यास अपघाताचा मोठा धोका असतो.

पालघरमध्ये दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी खासगी व्हॅनचालक महिन्याला १५०० ते २००० रुपये आकारतात. यासह सुट्टीच्या महिन्याचे देखील दिवाळी व उन्हाळ्यात पूर्ण महिन्याचे पैसे आकारले जातात. तसेच लांबच्या प्रवासासाठी अधिक शुल्क घेतले जाते. इतके पैसे देऊनही मुलांच्या सुरक्षिततेची कोणतीही खात्री नसते. सकाळी लवकर गाडी येणे आणि शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचायला एक ते दीड तास लागणे, यामुळे विद्यार्थी बराच वेळ कोंदटलेल्या आणि गर्दीच्या वाहनात बसलेले असतात. यामुळे त्यांना गुदमरल्यासारखे होऊन चक्कर येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

शासनाकडून ‘रस्ता सुरक्षा’ अभियान राबवले जात असले तरी, प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शालेय वाहतुकीतील या गंभीर त्रुटींकडे शाळा प्रशासन, वाहतूक पोलीस आणि एसटी प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप पालक करत आहेत.

धोकादायक बसने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

पालघर जिल्ह्याला नवीन बसगाड्या मिळाल्या असल्या तरी सार्वजनिक वाहतुकीची दयनीय अवस्था कायम आहे. सफाळे डेपोची एक एसटी बस अत्यंत धोकादायक स्थितीत असून तिची मागील बाजू पूर्णपणे तुटलेली आहे. अशा अवस्थेत ही बस दररोज आगरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन ये-जा करत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

उसरणी गावाचे ग्रामपंचायत सदस्य गौरव गावड यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत थेट राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. यावर सफाळे बस स्थानकाचे प्रमुख सनी जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘संबंधित बसची दुरुस्ती करण्यात आली आहे आणि लवकरच इतर जुन्या बसगाड्याही सेवेतून कमी केल्या जातील,’ असे आश्वासन दिले आहे.

मात्र केवळ आश्वासनांवर अवलंबून न राहता, परिवहन विभागाने सर्व बसगाड्यांची तांत्रिक तपासणी करून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गावड यांनी केली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शालेय विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक करतांना वाहन चालक आढळल्यास त्याच्यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तसेच याबाबत रिक्षा, डमडम, व्हॅन व शालेय वाहतूक व्यवस्थापनाला पोलीस प्रशासनाकडून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. या प्रकारची वाहतूक होताना आढळल्यास योग्य ती कारवाई पुढे देखील करण्यात येणार आहे – सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी पालघर जिल्हा वाहतूक शाखा