पालघर : गेल्या काही वर्षांपासून बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून मागील तीन वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील २५ गावातील जवळपास २५० आदिवासी महिला बांबूपासून राख्या तयार करत आहेत. जिल्हा परिषदेच्या बचत गट व केशवसृष्टी या संस्थेने तयार केलेल्या महिला समूहामुळे आदिवासी महिलांना राख्या, कंदील व तोरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे.
मलवाडा व इतर गावातील आदिवासी महिलांनी एकत्र येऊन २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या बचत गटात सहभाग घेतला. त्यानंतर या महिलांना विक्रमगड येथील केशवसृष्टी या संस्थेच्या वतीने इतर महिलांना एकत्रित करून समूह तयार करण्यात आला. त्यांना मार्केटिंग व इतर गोष्टींबाबत प्रशिक्षण देण्यात आले. २०२३ पासून या महिला बांबूपासून हाताने पर्यावरण पूरक राख्या तयार करत आहेत. या उपक्रमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला आहे. गरजू महिलांना आणि त्यातूनच प्रामुख्याने आदिवासी महिलांना घरकामाबरोबरच आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० ते १२ हजार रुपये सुरुवातीला निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीद्वारे त्यांना सुरुवातीला व्यवसाय उभा करण्यात हातभार लागला.
प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून २५० हून अधिक महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिला दरवर्षी बांबूपासून पर्यावरणपूरक राख्या बनवतात. एका राखीची किंमत प्रत्येकी ५० रुपये इतकी आहे. बांबूच्या राख्या तयार करण्यासाठी बांबूच्या सालीचा, खाण्याचे व नैसर्गिक रंग, तुळशीच्या लाकडापासून बनवलेले मनी, फेविकॉल व दोराचा वापर केला जातो. या साहित्यातून आदिवासी महिला राखी तयार करतात. यामध्ये बांबूच्या सालींपासून वेगवेगळे आकार, फुल, विविध नक्षीकाम केलेल्या राख्या उपलब्ध आहेत. याच महिलांनी मागील वर्षी राखीमध्ये वृक्षांच्या बिया टाकून राख्या तयार करून विक्री केल्या होत्या. या राख्या कुठे टाकल्या अथवा पडल्या तर त्यातून देशी झाडांची उत्पत्ती होऊन पर्यावरणास हातभार लागणे हा त्याचा मुख्य उद्देश होता.
या राख्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या महिला गाव पाड्यांसह शाळा, महाविद्यालय, जिल्हा परिषद व ठीकठिकाणी स्टॉल लावतात. जिल्हा परिषद देखील यांना याकरिता सहाय्य करत असते. यासह गणपती, दिवाळी या सणादरम्यान मागणीनुसार तोरण बनविणे, बांबूपासून कंदील तयार करणे अशा वस्तू देखील या महिला बनवत आहेत.
बांबू मिशनला देखील हातभार
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात बांबू लागवड मिशन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बांबू लागवड पर्यावरण संरक्षण व समतोल राखण्यासोबत शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणि आर्थिक उन्नती घडविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने आदिवासी महिला राख्यांपासून रोजगार निर्मिती करत असल्याने बांबूला प्रोत्साहन मिळत असून शेतकऱ्यांसोबत आदिवासी महिलांना देखील आर्थिक उन्नती घडणार आहे.
आदिवासी भागातील महिला एकत्र येऊन आपल्या दैनंदिन कारभार सांभाळून रोजगार निर्मिती करीत आहेत. जिल्हा प्रशासन याकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. महिलांना प्रोत्साहन मिळाल्यास त्यांना नवीन काही करण्याची उमेद येते. आदिवासी महिलांना रोजगार मिळावा तसेच पर्यावरणाचे रक्षण व्हावे हा यामागील मूळ उद्देश आहे. – डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प अधिकारी जिल्हा परिषद पालघर