पालघर : पालघर येथून विरार कडे जाणाऱ्या एका दुचाकी चालकाला अज्ञात वाहनचालकाने धडक दिल्याने अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालकाचा शोध घेण्याचे काम पालघर पोलीस करत आहेत.

पालघर शहराच्या बायपास रस्त्यावर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पालघर शहराच्या बाहेरील भागातून माहीम कडे जात असताना टेंभोडे कडे जाणाऱ्या मार्गाच्या काही अंतर पुढे महेश रामचंद्र पाटील (५०, राहणारा नारंगी विरार) यांच्या दुचाकीला एका वाहनाने धडक दिल्याने ते या बायपास मार्गे च्या दुभाजकाला धडकले. या अपघातामध्ये महेश पाटील यांचा जागीच मत्यू झाला.

या संदर्भात पोलिसांन माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात प्रत्यक्ष पाहणारी व्यक्ती न सापडल्याने हा अपघात स्वतः रस्त्यावरून घसरून झाला आहे का की या रस्त्यावर असणाऱ्या मोकाट जनावरांच्या धडकेमुळे झाला याविषयी प्रथम तपास सुरू केला. दरम्यान या दुचाकी स्वाराला एका चार चाकी वाहनाने धडक दिल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने या भागातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत.

पालघर बायपास रस्त्यावर अनेक मोकाट जनावरे असून त्यांची धडक बसून अथवा त्यांना चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचे अपघात होत असतात. शिवाय या मार्गीकेवर दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असून त्यामुळे देखील अपघात होण्यामागील कारण ठरत आहे. या बायपास मार्गेगेवर अनधिकृत मासळी बाजार, तसेच खाऊ गल्ली उभारण्यात आल्याने त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या वाहन पार्किंगमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपरिषद यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे प्राण जात आहेत अशी प्रतिक्रिया उमटत आहे.