-
महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी कणकवली येथे काल ३ मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली.
-
या सभेत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केल्याच पाहायल मिळालं.
-
सभेत ठाकरे म्हणाले की, “पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. आता हे सुरतेचे दोन व्यापारी छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत.”
-
“काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नौदल दिनानिमित्तच्या कार्यक्रमासाठी मालवणला आले. पण येथे काही भव्य प्रकल्प जाहीर करण्याऐवजी येथील प्रस्तावित पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला घेऊन गेले.”
-
“विनाशकारी प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारत असताना येथील तोंडचा घास काढून गुजरातला न्याल तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी रत्नागिरीत झालेल्या महायुतीच्या प्रचार सभेत ठाकरे यांच्यावर मुस्लीम मतपेढीचे राजकारण करत असल्याचा आरोप ठेवून राम मंदिर आणि मुस्लिमांची संबंधित काही मुद्दयांवर प्रतिक्रिया देण्याचे आव्हान दिले होते.
-
त्यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले की, “यापूर्वी मी यांच्या पक्षाला ‘भेकड जनता पार्टी’ म्हणत होतो. पण आम्हाला नकली म्हणणाऱ्यांची ही ‘बेअकली जनता पार्टी’ असल्याचे सिद्ध झाले आहे. राम मंदिराबाबत बोलण्याची तुम्हाला हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला. आम्ही राम मंदिराला पाठिंबा दिला. तेथे दोन वेळा जाऊनही आलो. पण तुम्ही भवानी मातेच्या मंदिरात का गेला नाही, याचे उत्तर द्या.”
-
“तुम्ही आज राज्यघटना बदलायला निघाला आहात, त्या घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेशासाठी आंदोलन केले. म्हणून २२ जानेवारी रोजी आम्ही त्या मंदिरात गेलो होतो. पण बाबासाहेबांनी आंदोलन केले तेव्हा तुमचे बुरसटलेले गोमूत्रधारी विरोध करत होते.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
“सावरकरांवर बोलायला सांगत आहात. तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये मुस्लीम लीगबरोबर बसलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर बोला. हिंमत असेल तर माझ्या वडिलांचे नाव लावून मते न मागता तुमच्या वडिलांचे नाव लावा आणि पुढे या”, असेही आव्हान ठाकरे यांनी दिले.
-
(सर्व फोटो साभार- शिवसेना फेसबुक पेज)
“गुजरातचे दोन व्यापारी..” उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर खोचक टीका
महाराष्ट्राचा घास काढून गुजरातला न्याल तर याद राखा असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Web Title: Uddhav thackeray on narendra modi and amit shah ubt shivsena sabha at kokan kankawali spl