-
सध्या सुबोध भावेच्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरुन वातावरण तापलं आहे. इतिहासाची मोडतोड केली असल्याचा आरोप करत ठाण्यातील एक शो बंद पाडण्यात आला. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचं काम काही पक्ष करत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. पण एखाद्या चित्रपटाला अशा रीतीने विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीदेखील बऱ्याच चित्रपटावर ऐतिहासिक घडामोडींची मोडतोड केल्याचे आरोप झाले आहेत.
-
हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘जोधा अकबर’ या चित्रपटावर तर राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यात बंदी घालायची मागणी झाली होती. जोधा यांचा विवाह जहांगीरशी झाला होता असंही कित्येकांचं म्हणणं होतं. या चित्रपटालाही कडाडून विरोध झाला.
-
शाहरुखच्या ‘असोका’ या चित्रपटातही ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड केल्याचे आरोप केले गेले. चित्रपटात अनेक ठिकाणी उगाच लिबर्टी घेतली गेली असल्याचे तज्ञांचे म्हणणे होते. ओडिशा विधानसभेचे माजी अध्यक्ष युधिष्ठिर दास यांच्यासह प्रख्यात इतिहासकारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन केले की जोपर्यंत हा चित्रपट तज्ञांच्या समितीला दाखवला जात नाही तोपर्यंत ओडिशामध्ये तो प्रदर्शित केला जाता कामा नये.
-
संजय लीला भन्साळी यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटावरुन तर खूप वाद झाले. नाचणारे बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी यांचा एकत्र नाच आणि यातील पात्रांमधला रोमान्स सगळ्यावरच इतिहासकारांनी आक्षेप घेतला, पण भन्साळी यांनी हा चित्रपट ‘राऊ’ या कादंबरीवर आधारित असल्याचं सांगून पळवाट काढली.
-
आमिर खानच्या ‘मंगल पांडे – द रायझिंग’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनासुद्धा दिल्ली उच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली होती. चित्रपटात मंगल पांडे ज्याने देशात सर्वप्रथम उठाव केला त्याचं चित्रण फार वाईट आणि चुकीच्या पद्धतीने केलं असल्याचे आरोप झाले आणि बऱ्याच राजकीय पक्षांनी याविरोधात आवाजदेखील उठवला होता.
-
‘द लेजंड ऑफ भगत सिंग’ हा अजय देवगणचा चित्रपट आजही लोक आवडीने बघतात. पण या चित्रपटावरही इतिहासाची मोडतोड केल्याचे आरोप झाले होते. चित्रपटात गांधीजी हे अतिमवाळ दाखवण्यात आल्याचे काही इतिहासकारांचे म्हणणे होते.
-
१९९३ च्या मुंबई बॉम्बब्लास्टवर बेतलेला अनुराग कश्यपच्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटावर २ वर्षं बंदी घातली गेली होती. यातही मुंबई पोलिसांची बाजू चुकीच्या पद्धतीने मांडल्याचं कित्येकांचं म्हणणं होतं.
-
भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ची चर्चा खूप झाली. करणीसेनेचे तीव्र आंदोलन आणि प्रेक्षकांचा जनक्षोभ यामुळे भन्साळी यांना चित्रपटातही काही बदल करावे लागले असं म्हंटलं जातं. मूळ कहाणीमध्ये भन्साळी यांनी बदल केल्याचं तेव्हा समोर आलं होतं.
-
अक्षय कुमारच्या नुकत्याच आलेल्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटालाही प्रचंड विरोध झाला. प्रथम नावावरून आणि मग त्यातील अनावश्यक रोमॅंटिक कहाणीमुळे प्रेक्षकांना नाराज केलं. सम्राट पृथ्वीराज यांच्या शौर्याचं एक टक्काही चित्रण या चित्रपटात केलं नसल्याचं लोकांनी सांगितलं. (फोटो सौजन्य : आयएमडीबी)
‘हे’ ऐतिहासिक चित्रपट अडकले होते वादाच्या भोवऱ्यात; इतिहासाची मोडतोड केल्याचे झालेले आरोप
या ऐतिहासिक चित्रपटांनाही कडाडून विरोध झाला होता.
Web Title: These bollywood historic movies faced backlash because of distortion of history avn