-
‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता योगेश शिरसाट याने शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत योगेशच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. योगेशसह आणखी काही कलाकारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
-
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील आपल्या विनोदी भूमिका आणि अभिनयामुळे अल्पावधीतच योगेशने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला.
-
योगेशसोबत अभिनेता राजेश भोसले, केतन क्षीरसागर, शेखर फडके आणि अलका परब यांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला आहे.
-
पक्षप्रवेशावेळी योगेश शिरसाट म्हणाला, आमच्या क्षेत्रातही कष्टकरी आहेत, अनेक कलाकार असे आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. या कलाकारांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत.
-
सिनेसृष्टीत धडपड करणाऱ्या कलाकारांचा आवाज आमच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे, असं योगेशने टीव्ही ९ मराठीला सांगितलं.
-
योगेश म्हणाला की, कलावंतांचे प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही सर्व कलाकार सुशांत दादाच्या (अभिनेता सुशांत शेलार) नेतृत्वात एकत्र आलो आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला
-
चित्रपट सृष्टीत धडपड करणाऱ्या कलावंतांच्या राहण्याचा प्रश्न आहे, तसेच इतर काही प्रश्न घेऊन आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहोत. त्यावर काही उपाय काढण्याची विनंती आम्ही करणार आहोत.
-
योगेशने आतापर्यंत ‘चला हवा येऊ द्या’सह अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मस्त चाललंय आमचं (२०११), व्हेंटिलेटर (२०१६), दुनियादारी (२०१३), ट्रिपल सीट, थॅंक्यू विठ्ठला, बस्ता, धर्मवीर (२०२२) आणि बोनस (२०२०) या चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
-
गेल्या वर्षी (२०२२) मध्ये प्रदर्शित झालेल्या धर्मवीर चित्रपटात योगेशने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांची भूमिका साकारली होती.
“…म्हणून मी शिवसेनेत प्रवेश केला”, ‘चला हवा येऊ द्या’मधील अभिनेत्याच्या राजकीय इनिंगला सुरुवात
धर्मवीर या चित्रपटात ‘वसंत डावखरे’ यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Web Title: Yogesh shirsat join shiv sena in presence of eknath shinde chala hawa yeu dya asc