-
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत घेत शिवसेना तसंच आदित्य ठाकरेंकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी काही मोठे खुलासादेखील केले आहेत. जाणून घ्या त्यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्वाची विधानं…
-
“आदित्य ठाकरेंचं आव्हान पोकळ आहे. आपल्या भागातील लोकांवर अन्याय होतो तेव्हा तेथील जनता पेटून उठते. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा कोकणावर अन्याय झाला असं लोकांना वाटलं. त्यावेळी श्याम सावंत यांना सोडलं तर शिवेसनेचे सर्व उमेदवार पडले होते हा इतिहास आहे. धमक्या कोणाला देत आहेत, कोणीही घाबरत नाही,” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
-
“मतदारसंघात पक्षाची मतं १०० टक्के असतात. २०, २५ टक्के मतं तुमची असतील तिथे राष्ट्रवादीचीदेखील १०- १५ टक्के असतात. उमेदवाराची प्रसिद्धी, काम यावर लोक मतदान करत असतात. पक्षामुळे उमेदवार निवडून येत असतो, तसंच उमेदवारामुळे पक्षाच्या जागा निवडून येतात हेदेखील खरं आहे,” असंही केसरकर म्हणाले.
-
“आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसं वागावं, बोलावं यासाठी त्यांनी वडिलांचं उदाहरण घ्यावं. ते जर इतर नेत्यांसारखं बोलू लागले तर हे प्रकरण अजून चिघळेल. ते माझ्यापेक्षा निम्या वयाचे आहेत. पण ते जेव्हा येतात तेव्हा मी उठून उभा राहतो. कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आम्ही बोलत नाही म्हणजे आमच्याकडे मुद्दे नाहीत असं नाही,” असा इशारा केसरकरांनी दिला.
-
“आम्हा शिवसैनिकांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेणं आमच्या मनाला लागलं आहे. तुम्ही कितीही यात्रा काढा, पण लोकांच्या मनात संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला तर आम्ही बोलणार,” असा इशारा केसरकरांनी यावेळी दिला.
-
“आम्ही तुमच्या आदरापोटी शांत आहोत. बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुमच्या रक्तात शिवसेना आहे. पण यांच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवेसना आणली आहे. त्यामुळे तो अभिमान बाळगत असताना सामान्य शिवसैनिकाचा अपमान करु नका. आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला. कोर्टात जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करणार आहोत,” असंही ते म्हणाले.
-
“आम्ही आमची आमदारकी वाचवू शकलो असतो, आम्ही आमचा वेगळा गट स्थापन करुन दुसऱ्या पक्षात विलीन करु शकलो असतो, पण ते आमच्या रक्तात नाही म्हणूनच याला शिवसेनेचं रक्त म्हणतात. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, म्हणून आमदारकी पणाला लावली. तुमच्यात ही हिंमत असेल तरच स्वत:ला शिवसैनिक म्हणा,” असं आव्हान केसरकरांनी दिलं.
-
“भावनात्मक आव्हान करत लोकांची दिशाभूल केली जात असून हे थांबलं पाहिजे. भावना वस्तुस्थितीथी जोडून असल्या पाहिजेत. उद्धव ठाकरे आजारी असताना बंड करण्यात आलं हे खोटं आहे. उद्धव ठाकरे बरे झाल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत त्यांची भेट झाली. यावेळीच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडा सांगितलं होतं,” असं केसरकरांनी सांगितलं.
-
“मी तर गेल्या सव्वा वर्षापासून शिवसेना संपवत असल्याचं सांगत होतं. आम्ही बोललो होतो याचे पुरावेही आहेत,” असं केसरकरांनी सांगितलं. सगळे कार्येकर्ते निघून जातील असं वाटत असल्यानेच यात्रा काढल्या जात आहेत अशीही टीका त्यांनी केली.
-
आदित्य ठाकरे कधी भेटलेच नसल्याने त्यांना खरा शिवैसनिक कोण आणि खोटा कोण हे माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यालाही ते शिवसैनिक म्हणतील असा टोला केसरकरांनी लगावला.
-
“शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेब एकवचनी होते. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं गेलं होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण ते मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड केलं नाही, ते शांत राहिले,” असं केसरकरांनी सांगितलं.
-
“आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना भेटायला बोलावलं होतं आणि माझं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देतो सांगितलं. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या डोळ्यात अश्रू आले होते. यातून त्यांची एकनिष्ठता दिसते. मुख्यमंत्रीपद नको, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडा. ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. भाजपासोबत युती करा आणि त्याचे मुख्यमंत्री व्हा असं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांची बदनामी का केली जात आहे? तुम्हाला आघाडी तोडावीशी का वाटली नाही याचं उत्तर द्या,” अशी विचारणा केसरकरांनी केली आहे.
-
“उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन करुन शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिल्याचं वृत्त मी वाचलं. पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते जे तुम्हाला वडिलांसमान मानत आहेत त्यांच्याबद्दल असं बोलत असाल, तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल?,” अशी विचारणा केसरकरांनी केली आहे.
-
“हे खरं आहे की खोटं समोर आलं पाहिजे. हर्षल प्रधान यांनी हे खोटं आहे असं सांगितलं. तसं असेल तर अनिल परब यांचा फोन तपासा. त्यांच्या फोनमधून फडणवीसांना फोन गेला असेल तर नक्की तसं घडलं असेल. उद्धव ठाकरेंच्या फोनवरुन फोन केला जात नाही हे मला माहिती आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
-
“शिंदेंच्या बंगल्यावर रोज हजार लोक असतात, शिवसैनिकांची रांग असते. आमच्या पाठीवर हात फिरवा इतकीच शिवसैनिकांची अपेक्षा होती. मग तो हात गेल्या काही वर्षात का फिरला नाही? त्यामुळे शिवसैनिका गृहित धरु नका आणि त्याला आव्हानही देऊ नका. अन्यथा सर्वसाधारण शिवसैनिक पेटून उठेल,” असं त्यांनी सांगितलं.
-
(All File Photos)
“उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही मुख्यमंत्रीपद घ्या, शिंदेंच्या डोळ्यात पाणी,” ‘त्या’ भेटीत नेमकं काय झालं होतं? शिंदे गटाचा खुलासा
आम्ही तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना तुम्हीही आदराने बोला, केसरकरांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
Web Title: Shivsena deepak kesarkar press conference uddhav thackeray eknath shinde aditya thackeray bjp devendra fadanvis sgy