-
लोकसभेमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नियुक्तीला दिलेली मंजुरी रद्द करावी आणि १२ खासदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी गुरुवारी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन केली.
-
गटनेते बदलाच्या लोकसभाध्यक्षांच्या निर्णयाविरोधातही शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे.
-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी लोकसभाध्यक्षांची त्यांच्या संसदेतील दालनात भेट घेतली.
-
शिंदे गटातील १२ खासदारांना अपात्र जाहीर करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे बिर्ला यांच्याकडे केली.
-
लोकसभाध्यक्षांची भेट घेण्यापूर्वी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करून राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान दिले.
-
लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची तर, मुख्य प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती केली जावी, अशी मागणी करणारे पत्र १९ जुलै रोजी शिंदे गटातील १२ खासदारांनी बिर्ला यांची भेट घेऊन सादर केले होते.
-
या पत्राची तातडीने दखल घेत बिर्ला यांनी त्याच दिवशी गटनेते बदलाला मंजुरी दिली होती.
-
मात्र, ही मंजुरी आणि लोकसभाध्यक्षांची कृती एकतर्फी आणि बेकायदा असल्याचा दावा शिवसेनेने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये केला आहे.
-
गटनेतेपदी बदल करण्याच्या शिंदे गटाच्या विनंतीवर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेचे म्हणणे ऐकून घेतले जावे, अशी विनंती बिर्ला यांना करण्यात आली होती.
-
शिवाय, शिंदे गटाने लोकसभेतील गटनेते बदलासंदर्भात बिर्ला यांना पत्र देण्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने गटनेतेपदी विनायक राऊत व मुख्य प्रतोदपदी राजन विचारे यांची नियुक्ती केल्याचे पत्र बिर्ला यांना देण्यात आले होते.
-
मात्र, बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदावरील नियुक्तीला एकतर्फी मंजुरी दिली.
-
गटनेता बदलण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यापूर्वी बिर्ला यांनी शिवसेनेकडे स्पष्टीकरण मागितले नाही, असा युक्तिवाद शिवसेनेच्या नव्या याचिकेत करण्यात आला आहे.
-
शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज करून ‘धनुष्यबाण’ या शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे / ट्विटर)
-
(हेही पाहा : महाराष्ट्र सरकार कोसळणार? सत्तांतर होणार?)
Photos: शिंदे गटातील त्या १२ खासदारांवरही अपात्रतेची टांगती तलवार; जाणून घ्या नेमकं घडलंय काय
शिंदे गटातील १२ खासदारांना अपात्र जाहीर करण्याची विनंती त्यांनी पत्राद्वारे बिर्ला यांच्याकडे केली.
Web Title: Shiv sena uddhav thackeray sanjay raut maharashtra cm eknath shinde 12 mp disqualification lok sabha photos sdn