-
राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली.
-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युतीचं स्वागत केलं.
-
दरम्यान, राज्यात सध्या निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेला बंडखोरीमुळे बसलेला फटका या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना तुफान टोलेबाजी केली.
-
संभाजी ब्रिगेडसोबत युतीचं स्वागत करताना राज्याला दुहीचा शाप असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. हे बोलताना त्यांचा रोख एकनाथ शिंदे गटाच्या दिशेनेच असल्याचं बोललं जात आहे.
-
“आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
-
महाराष्ट्रात सध्या जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे, असंदेखील ते म्हणाले.
-
‘कत्राटी मुख्यमंत्री’ अशी टीका आपण मुख्यमंत्र्यांवर केलीच नाही, असं ते म्हणाले. “मध्यंतरी केंद्राने एका निर्णयात कंत्राटी पद्धतीने सर्व काही करावं असं सांगितलं होतं. त्यावर मी, असं असेल तर आपण पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीही कंत्राटी पद्धतीने का नेमू नयेत अशी विचारणा केली होती. कंत्राट काढा आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान यांची नियुक्ती करा असं माझं वाक्य होतं”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी ‘असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा’ असं प्रत्युत्तर दिलं असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “बरं झालं ते माझ्यापासून दूर गेले. त्यामुळे असंगाशी जो संग होता तो गेला. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण इतर वेळी त्यांच्या हेरयंत्रणा कार्यरत असतात, त्याप्रमाणे आमच्या भाषणाचीही नीट माहिती घेऊन बोलावं”, असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेंना लगावला.
-
कंत्राटी मुख्यमंत्री अशी टीका उद्धव ठाकरेंनी केल्यावरून एकनाथ शिंदेंनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली होती. “असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा”, असं ते विधानसभेतील भाषणात बोलताना म्हणाले होते.
-
दरम्यान, एकीकडे शिंदे गटाला खोचक टोला लगावताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव घेत भाजपाला देखील खोचक शब्दांत सुनावले आहे.
-
“२५ ते ३० वर्ष आम्ही हिंदुत्वाच्या स्वप्नासाठी भाजपासोबत युती केली होती. संघाची एक विचारधारा आहे. पण ती विचारधारा घेऊन भाजपा पुढे जातेय असं तुम्हाला वाटतंय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
-
आपल्या मातृसंस्थेलाच भाजपा मानत नसेल, तर त्यांना याबाबत विचारायला हवं. संघाची विचारसरणी भाजपाला मान्य आहे का? मान्य असेल तर तसे ते वागत आहेत का? मोहन भागवतांनी गेल्या दोन-चार वर्षांत मांडलेल्या मतांनुसार भाजपा वागतेय का?” असा सवालदेखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
दुहीचा शाप, संघाची विचारसरणी आणि असंगाशी संग.. संभाजी ब्रिगेडशी युतीनंतर उद्धव ठाकरेंची टोलेबाजी!
Shivsena Sambhaji Brigade Yuti : संभाजी ब्रिगेडशी युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी!
Web Title: Uddhav thackeray shivsena alliance with sambhaji brigade eknath shinde bjp rss mohan bhagwat pmw