-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गट प्रमुखांचा मोठा मेळावा घेतला. गोरेगावमधील नेस्को मैदानात हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेनी आतापर्यंत केलेल्या आंदोलनावर भाष्य केलं.
-
या आंदोलनावर पुस्तिका काढणार असल्याचीही माहिती राज ठाकरेंनी दिली. हनुमान चालिसा ते उद्धव ठाकरेंवर टीका राज ठाकरेंच्या सभेतील काही महत्वाचे जाणून घेऊया.
-
काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत.
-
यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही, अशी टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
-
रझा अकादमीच्या गुंडगिरीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता. पण, त्यावेळेला इतर पक्ष गप्प का बसले होते? हिंदुत्वाच्या नावाने राजकारण करणारी शिवसेना कुठे होती तेंव्हा, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे.
-
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मनापासून इच्छा होती की, मस्जिदीवरील भोंगे खाली उतरले पाहिजेत. मात्र, हे आंदोलन तडीस नेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. त्यांच्या भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावली भोंगे आपोआप खाली उतरले.
-
अजून सगळे भोंगे उतरले नाहीयेत, अजून काहींची चरबी उतरली नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा पोलिसात तक्रार करा. पोलिसांनी लक्षात ठेवाव की जर तुम्ही कारवाई केली नाहीतर तुमच्यावर कोर्टाचा अवमानाचा गुन्हा दाखल होईल. तरीही भोंगे बंद नाही झाले, तर मात्र मशिदीसमोर हनुमान चालिसा लावाच, असे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केलं.
-
आम्ही रेल्वे भरती आंदोलन केलं. महाराष्ट्रातील हजारो मुलांना नोकऱ्या मिळाल्या. ज्या राज्यात नोकऱ्या उपलब्ध होतील, तिथल्या स्थानिकांना प्रथम प्राधान्य मिळालंच पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
-
महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प बाहेर जात आहेत. मला प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच वाईट वाटत नाही. ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेला असता तरी हरकत नव्हती. देशातील प्रत्येक राज्य प्रगत होऊ दे, पण मोदींनी फक्त गुजरात गुजरात करू नये ही अपेक्षा आहे, असा सल्लाही राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.
-
आपलं वय काय आपण, बोलतो काय? राज्यपाल पदावर बसला आहे, म्हणून मान राखतोय. नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही. राज्यपाल कोश्यारी यांनी गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा, तुम्ही तुमचे राज्य सोडून महाराष्ट्रात का आला.
-
तुमच्या राज्यात का नाही व्यापर केला, उद्योग धंदे थाटले. यांचं कारण, उद्योग आणि व्यापर करण्यासाठी महाराष्ट्रासारखी सुपीक जमीन कोठे नव्हती. आता या गुजराती आणि मारवाडी लोकांना सांगितलं, आता तुमच्या राज्यात जाऊन उद्योग करा. तर हे जातील का?, असा सवालही राज ठाकरेंनी विचारला.
-
हल्ली कोणीही काहीही बरळत आहे. राजकारणाचा दर्जा खूप खाली जात आहे. त्याला मर्यादा राहिलेली नाही. राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही बोलतात. राज्यातील एक मंत्री महाराष्ट्रातील महिला नेत्यावर अभद्र शब्दांत टीका करतो. आजपर्यंत मी असा महाराष्ट्र कधीही पाहिला नाही, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुप्रिया सुळेंवरील विधानावरून अब्दुल सत्तारांनी खडसावलं आहे.
-
गेल्या ५ वर्षात पाच लाख उद्योजक देश सोडून परदेशात निघून गेले. देशांत फक्त जात-पात आणि महापुरुषांच्यावर टीका करणं इतकंच सुरु आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅन्डल सोप (राहुल गांधी ) हे सावरकरांबद्दल वाट्टेल ते बरळून गेले. काय माहिती आहे सावरकरांबद्दल तुम्हाला?
-
राहुल गांधींची लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. राहुल गांधी सावरकरांवर बोलणार, भाजप नेहरूंबद्दल बोलणार, मग अजून कोणतरी अजून एखाद्या महापुरुषांवर बोलणार. हे किती दिवस चालणार, ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्या सगळ्या महापुरुषांना का बदनाम करताय, असेही राज ठाकरेंनी म्हटलं.
-
माझं काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांना आवाहन आहे. सावरकर, नेहरू, टिळक यांची बदनामी थांबवा. यातून काय साध्य होतं? बस्स, झालं आता. देशासमोर आजचे जे ज्वलंत प्रश्न उभे आहेत त्यावर लक्ष देऊया, असे राज ठाकरे म्हणाले.
Photos : उद्धव ठाकरे, राज्यपालांवर हल्लाबोल ते राहुल गांधींवर ‘म्हैसूर साबण’ म्हणत टीका; राज ठाकरेंच्या सभेतील १० मुद्दे
राज ठाकरे म्हणतात, “माझं काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांना…”
Web Title: Raj thackeray on uddhav thackeray rahul gandhi governor bhagatsingh koshyari hanuman chalisa in goregaon ssa