-
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या भविष्याबाबत मोठा दावा केला आहे.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.
-
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंकडून आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
-
संजय राऊत गुरुवारी (२२ डिसेंबर) दिल्लीतील या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा.
-
खोके सरकारचे एक खासदार राहुल शेवाळेंनी कारण नसताना संसदेत एक विषय उपस्थित केला – संजय राऊत
-
चर्चा १९३ अंतर्गत एका वेगळ्या विधेयकावर होती. देशात वाढलेला अमली पदार्थांचा वाढलेला व्यापार आणि नेटवर्क यावर चर्चा होती. असं असताना खासदार शेवाळे अचानक युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर घसरले – संजय राऊत
-
हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत रंगवण्यात आला. चौकशीची मागणी झाली, सुशांत सिंह राजपूतशी संबंध जोडण्यात आला – संजय राऊत
-
प्रश्न इतकाच आहे की, राहुल शेवाळेंना हे बोलण्याचा अधिकार आहे का? शेवाळेंसह हे सर्व लोक कालपर्यंत शिवसेनेतच होते – संजय राऊत
-
मुळात सुशांत प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. आमचं सरकार असतानाही भाजपाने आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला – संजय राऊत
-
या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांशिवाय बिहार पोलिसांनीही केला. खरंतर बिहार पोलिसांचा यात संबंधच नव्हता – संजय राऊत
-
हा तपास सीबीआयकडेही गेला. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपा सांगेल तसे गुन्हे दाखल करतात, निकाल देतात. असं असतानाही सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आणि सुशांतने आत्महत्याच केल्याचं स्पष्ट झालं – संजय राऊत
-
यानंतरही हा विषय काढून महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत नेला. कारण दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या नागपूरच्या एनआयटी भूखंड घोटाळ्यावर गदारोळ सुरू होता – संजय राऊत
-
भूखंड प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टांगती तलवार आहे. त्यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी परिस्थिती आहे – संजय राऊत
-
शिंदेंच्या भ्रष्टाचार प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी संसदेत दिशा-सुशांतचा विषय काढण्यात आला आणि तो विषय महाराष्ट्रात नेण्यात आला – संजय राऊत
-
नागपूरमध्ये एनआयटीची १६ भूखंड ज्या बेकायदेशीर पद्धतीने उच्च न्यायालयाची स्थगिती असताना, गिलानी आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही राज्याचे तत्कालीन नगरविकासमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ११० कोटी रुपयांचे भूखंड रेवड्या वाटाव्या तसे दोन कोटीला विकले – संजय राऊत
-
हा भ्रष्टाचार आहे. हा भ्रष्टाचार विरोधकांनी विधिमंडळात आणि बाहेर उचलून धरला, राजीनाम्याची मागणी झाली, प्रकरण शेकतंय हे लक्षात आलं तेव्हा त्यावरील लक्ष्य विचलित करण्यासाठी आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला – संजय राऊत
-
नागपूरच्या १६ भूखंडाचं प्रकरण साधं नाही. गरिबांच्या घरांसाठी राखीव भूखंड १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवहार करून मर्जीतील बिल्डरांना देण्यात आले. त्यावर प्रश्नचिन्ह आहे – संजय राऊत
-
ते प्रश्नचिन्ह आम्ही उभं केलेलं नाही. दीड महिन्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, नागोराव गाणार या विदर्भातील आमदारांनीच यावर तारांकित प्रश्न विचारला. तसेच चौकशीची मागणी केली – संजय राऊत
-
तोच विषय आम्ही घेतला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एकनाथ शिंदेंच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण उघड व्हावं ही भाजपातील देवेंद्र फडणवीसांना मानणाऱ्या आमदारांची इच्छा आहे – संजय राऊत
-
हे प्रकरण बाहेर काढण्यात भाजपाच्या प्रमुख लोकांचा हात आहे. ते कोण आहेत हे मला सांगण्याची गरज नाही – संजय राऊत
-
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच या १६ भूखंडांविषयीचा प्रश्न विचारला आहे – संजय राऊत
-
योगायोग असा आहे की, त्याआधी दोन दिवस नागपुरातील एका कार्यक्रमात बावनकुळे फडणवीसांच्या समोर सांगत होते की, मी प्रदेशाध्यक्ष असतानाच तुम्ही मुख्यमंत्री व्हा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भूखंड घोटाळ्याचं प्रकरण समोर येतं – संजय राऊत
-
बावनकुळेंच्या विधानाचा आणि बाहेर आलेल्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अर्थ सध्याच्या खोके सरकारने समजून घेतला पाहिजे – संजय राऊत
-
आमच्यावर, शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा सरकारमध्ये अंतर्गत कलह सुरू आहेत, वाद सुरू आहेत त्यावर लक्ष द्यावं – संजय राऊत
-
आज भाजपाचे लोक तोंडदेखलेपणाने शिंदे गटाची बाजू घेत आहेत. मात्र, महाराष्ट्रात आणि दिल्लीत पडद्यामागे काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे – संजय राऊत
-
हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही हे मी वारंवार म्हणतो आहे. मी पुन्हा एकदा त्यावर ठाम आहे – संजय राऊत
-
हे भूखंड प्रकरण, १०० कोटींचा व्यवहार कोणी केला, या व्यवहाराचा साक्षीदार कोण आहे हे त्यांना माहिती आहे – संजय राऊत (सर्व छायाचित्र – संग्रहित)
Photos : “शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, कारण…”, संजय राऊतांचा मोठा दावा
दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंकडून आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. याचा हा आढावा.
Web Title: Sanjay raut big claim that shinde fadnavis government will collapse before february 2023 pbs