-
अध्यक्षपदाचा राजीनामा आणि त्यानंतर तो मागे घेण्याचा निर्णय यामुळे शरद पवार गेल्या दोन दिवसांत चर्चेत राहिले आहेत. त्यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटलेल्या दिसल्या.
-
दरम्यान, या प्रतिक्रिया आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवारांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत जोरदार टोलेबाजी केली.
-
यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाही लक्ष्य केलं. महाराष्ट्रात अवकाळी असताना मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचार करतायत, यावर पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला.
-
पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, “त्यांचा काही दोष नाही. यांचं मुख्यमंत्रीपद हे भाजपाच्या १०० आमदारांच्या बळावर आहे. त्यामुळे तिथून जो आदेश येईल, तो शिंदेंना मान्य करावा लागतो”.
-
देवेंद्र फडणवीसांनी साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आणि राष्ट्रवादीचं पार्सल असा उल्लेख केल्यावरही पवारांनी टोला लगावला. “ते काहीही बोलू शकतात. शब्दांचा खेळ करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे”, असं पवार म्हणाले.
-
भाजपाशी राष्ट्रवादीचा प्लॅन बी सुरू – पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानावर पवार म्हणतात, “त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासावं”
-
सत्तासंघर्षाचा निकाल १४ तारखेच्या आत येण्याची शक्यता पवारांनी वर्तवली. “१४ तारखेला त्यांचे न्यायाधीश निवृत्त होतात. त्यापूर्वी त्यांना निकाल द्यावा लागेल असं या क्षेत्रातले लोक सांगतात”, असं पवार म्हणाले.
-
भाजपाचं धोरण हे आहे की सत्ता मिळाली नाही. लोकांनी नाकारलं तर सत्ता आणि संपत्ती याचा वापर करून लोक फोडायचे आणि संसदीय लोकशाही पद्धती उद्ध्वस्त करायची आणि सत्ता मिळवायची – शरद पवार
-
कर्नाटकात भाजपाचं बहुमत नव्हतं गेल्या वेळी. पण सत्ता आणि इतर गोष्टींच्या जोरावर त्यांनी सत्ता घेतली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यांनी शिंदे आणि इतर काही मंडळींना फोडलं आणि सत्ता हस्तगत केली. मध्य प्रदेशात कमलनाथ य़ांचं सरकार होतं. तिथे लोक फोडले आणि तिथे त्यांनी सरकार आणलं – शरद पवार
-
नरेंद्र मोदींच्या बजरंग बली की जय विधानावर शरद पवारांनी टीकास्र सोडलं. “मला गंमत वाटते की देशाचे पंतप्रधान अशी भूमिका लोकांसमोर मांडतात. तिथली निवडणूक तुम्ही कामांवर लढा. तुम्ही सत्तेत असताना काय करून दाखवलं हे सांगा”, असं पवार म्हणाले.
-
खोक्याचा संदेश कुठपर्यंत गेला आहे हे आपल्याला दिसतंय. असं करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दलची चिंता काय करायची? – शरद पवार
-
पवारांनी रयत शिक्षण संस्थेची घटना बदलली या बावनकुळेंच्या आरोपांवर शरद पवार म्हणतात, “मी स्वत: मॅनेजिंक कौन्सिलला आहे. मी अनेक वर्षं तिथे आहे. त्यामुळे घटना बदलायचं कारण काय?”
-
कर्नाटकमध्ये आम्हाला प्रवेश करायचा होता. त्यामुळे आम्ही ९ उमेदवार दिले आहेत. हे सर्व उमेदवार वेगवेगळ्या समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतात – शरद पवार
-
टीका-टिप्पणीचा काहीही परिणाम मविआवर होणार नाही. राजकीय पक्षांच्या धोरणात प्रत्येकाची भूमिका सहकारी पक्षाशी १०० टक्के सहमत असेल असं कधी होत नाही – शरद पवार
-
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वारसदार तयार करण्यात अपयशी ठरले, अशी टिप्पणी सामना अग्रलेखातून करण्यात आली होती. त्यावरून पवारांनी टोला लगावला आहे.
-
“आम्ही काय केलंय हे त्यांना माहिती नाही. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही पक्षाचे सहकारी अनेक गोष्टी बोलतो, वेगवेगळी मतं असतात. पण बाहेर जाऊन त्याची प्रसिद्धी कधी करत नसतो. हा आमच्या घरातला प्रश्न असतो”, असं ते म्हणाले.
-
“आमच्या प्रत्येक सहकाऱ्याला हे माहिती असतं की आपला पक्ष पुढे कसा जाणार आहे. उद्या नवीन नेतृत्वाची फळी पक्षात कशी तयार केली जाते याची खात्री पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना आहे”, असंही शरद पवार म्हणाले.
“शिंदेंचा दोष नाही” ते “फडणवीसांचं वैशिष्ट्य”…शरद पवारांची साताऱ्यात तुफान टोलेबाजी; राऊतांचाही घेतला समाचार!
शरद पवारांच्या राजीनाम्यापासून सुरू झालेला आरोप-प्रत्यारोपांचा आणि दावे-प्रतिदाव्यांचा कलगीतुरा अद्याप थांबण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीयेत. आधी पवारांच्या राजीनाम्यावर, त्यानंतर राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयावर आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील वारसदाराच्या चर्चांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत! (सर्व छायाचित्रे संग्रहीत)
Web Title: Sharad pawar satara pc targets devendra fadnavis sanjay raut prithviraj chavan pmw