Aam Aadmi Party Expels Two MLAs : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीने गुजरात व पंजाबमधील विधानसभा पोटनिवडणूक जिंकून दमदार पुनरागमन केले. मात्र, विजयाचा गुलाल फिका पडण्याआधीच ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दोन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीत नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, ‘आप’ने पक्षातून काढून टाकलेले दोन आमदार कोण आहेत? त्यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात आली? ते जाणून घेऊ…

गुजरातमधील विसावर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला पराभूत करून आपचे उमेदवार गोपाल इटालिया यांनी विजयी गुलाल उधळला. तर, पंजाबमधील लुधियाना मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार संजीव अरोरा यांनी काँग्रेसच्या भारतभूषण आशू यांचा १० हजार मताधिक्यानं पराभव केला. पंजाब व गुजरातमध्ये आणखी दोन वर्षांनी २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्यानं या विजयामुळे ‘आप’चा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मात्र, या विजयाचा गुलाल फिका पडण्याआधीच पक्षानं दोन आमदारांची तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.

सरकारवर टीका करणं आमदाराला भोवलं

पंजाबमधील अमृतसर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांची आपनं पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. ही कारवाई पक्षाच्या शिस्तभंग समितीने केली असून, त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील भ्रष्टाचारविरोधी पथकानं शिरोमणी अकाली दलाचे वरिष्ठ नेते विक्रम मजिठिया यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर आमदार कुंवर विजय प्रताप यांनी या कारवाईवरून आप सरकारवर टीका केली होती. इतकंच नाही, तर त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या कारवाईचा व्हिडीओही शेअर केला होता.

आणखी वाचा : संजय गांधींच्या मैत्रीण रुख्साना सुलताना कोण होत्या? आणीबाणीत १३ हजार पुरुषांची नसबंदी कुणी केली?

आमदार कुंवर विजय प्रताप काय म्हणाले होते?

  • विक्रम मजिठिया हे जेव्हा तुरुंगात होते, तेव्हा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांची कोणतीही चौकशी केली नाही.
  • त्यांना न्यायालयानं जामीन दिल्यानंतर सरकारनं त्यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई केली, असे विजय प्रताप यांनी म्हटलं होतं.
  • प्रत्येक कुटुंबाची प्रतिष्ठा असते आणि एखाद्याच्या घरी भल्या पहाटे धाड टाकणं चुकीचं व अनैतिक आहे.
  • सरकारकडून पोलिस आणि तपास यंत्रणांचा आपल्या फायद्यासाठी वापर केला जात आहे.
  • पण, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लक्षात ठेवावं की, त्यांना या कारवाईचा काहीच फायदा होणार नाही.
  • आमदार कुंवर विजय प्रताप यांच्या या विधानानंतर आम आदमी पार्टीनं एक निवेदन जाहीर केलं.
  • सरकारनं केलेल्या कारवाईवर शंका घेऊन, त्यात अडथळा आणणाऱ्यांसाठी पक्षात जागा नाही, असं पक्षानं निवेदनात म्हटलं.
  • ड्रगविरोधी मोहीम हा आम आदमी पक्षाचा मूलभूत अजेंडा आहे, असंही आपनं निवेदनातून स्पष्ट केलं.
  • आमदार कुंवर विजय प्रताप यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं.

आमदार उमेश मकवाना यांची ‘आप’मधून हकालपट्टी

विशेष बाब म्हणजे आम आदमी पार्टीनं गुजरातमधील बोटाद विधानसभा मतदासंघाचे आमदार उमेश मकवाना यांचीही शनिवारी (२८ जून) हकालपट्टी केली होती. कडा विधानसभेत आपच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षातील महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला होता. इतकेच नाही, तर त्यांनी या पराभवाचं खापर पक्षातील नेत्यांवर फोडलं होतं. गुजरातमधील कडी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्यासाठी आम आदमी पार्टीचे उमेदवार जगदीश चावडा १० लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं, असं सांगत, आमदार उमेश मकवाना यांनी पक्षावर दलित उमेदवारांप्रति भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला होता.

पंजाबमधील अमृतसर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांची आपनं पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. (छायाचित्र पीटीआय)

हेही वाचा : Emergency in 1975 : संजय गांधी व त्यांच्या निकटवर्तीयांवर शाह आयोगाने काय काय आरोप केले होते?

उमेश मकवाना यांनी पक्षावर काय आरोप केला होता?

“विसावदरच्या पोटनिवडणुकीत पटेल समुदायातील गोपाल इटालिया यांच्यासाठी आपचे संपूर्ण नेते प्रचारात गुंतले होते. त्यांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानं ते निवडून आले. कडीचा उमेदवार गरीब आणि दलित असल्यामुळे पक्षानं त्याला एकटं सोडलं. अशा प्रकारचा भेदभाव खपवून घेतला जाणार नाही. मागासवर्गीय आणि ओबीसी समुदायांचा वापर फक्त निवडणुकीच्या काळात मतदानासाठी केला जातो. मी ज्या कोळी समुदायाचं प्रतिनिधित्व करतो, त्या समाजातील नेत्यांचाही वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जातो, असंही मकवाना म्हणाले होते.

आपचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी काय म्हणाले होते?

दरम्यान, आमदार उमेश मकवाना यांच्या आरोपाचं आम आदमी पार्टीने खंडन केलं होतं. त्यानंतर आम आदमी पार्टीचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष इसुदान गढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन, मकवाना यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. तसेच त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक जिंकून दाखवण्याचं आव्हानही दिलं. मकवाना यांनी पक्षातील नेत्यांवर केलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचं इसुदान गढवी यांनी स्पष्ट केलं होतं. आमदार मकवाना हे भाजपाबरोबर संगनमत करून, जाणीवपूर्वक पक्षाला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.