सुहास सरदेशमुख

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या पक्षात असू त्या पक्षातील सर्वोच्च पदावरील नेत्याची स्तुती करायची, ते मतदारसंघात आले की त्यांच्यावर फुलांची उधळण करायची, त्यांच्यासमोर गर्दी दाखवायची, त्यातून लाभ मिळवायचा आणि वेळ पडतीलच तर नेतृत्वावरही टीका करायची, ही मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांची राजकीय कार्यशैली. एखादे प्रकरण विरोधात जाईल, असे लक्षात आले की माध्यमांमध्ये हसून त्याचे गांभीर्य घालवून टाकायचे, या वृत्तीमुळे नेहमी वादग्रस्त ठरणाऱ्या अब्दुल सत्तार यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले. रामराम, सलाम, जयभीम, जय हिंद, जय महाराष्ट्र असे एका दमात म्हणणाऱ्या सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ मात्र बांधलेला. कार्यशैलीवरुन न्यायालयाने दोन वेळा फटकारलेल्या मंत्री सत्तार यांची बढती आता राज्य सरकारची प्रतिमा उंचावणारी ठरेल काय, याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा- भाजप नेत्यांच्या विरोधावर मात करत राधाकृष्ण विखे मंत्रीपदी!

टीईटी घोटाळयाच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही यावरून चर्चा सुरू असताना महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या चुकांची यादीही आवर्जून सांगण्यात येत आहे. सत्तार यांना उच्च न्यायालयाने दोन प्रकरणांत फटकारले होते. मात्र, त्याचा सत्तार यांच्या राजकीय कारकीर्दीवर परिणाम झाला नव्हता. तो ‘टीईटी’ प्रकरणानंतरही झाला नाही. जालना लोकसभा मतदारसंघात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मैत्र राखत भाजपच्या गाडीत बसण्याच्या सत्तार यांच्या प्रयत्नांना पद्धतशीरपणे शिवसेनेकडे वळविले गेले. मंत्री असेपर्यंत उद्धव ठाकरे यांचे तेच निकटवर्तीय व निष्ठावंत अशी प्रतिमा ते भाषणातून निर्माण करत, तेव्हा शिवसैनिकही भुवया उंचावत. शिवसेनेत फूट पडली आणि शिंदे गटात ते सहभागी झाले. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी सत्तार यांच्या मुलींची नावे ‘टीईटी’ घोटाळ्यात पुढे आली आणि विस्तारात त्यांचे नाव येणार नाही अशी चर्चा सुरू झाल्यानंतर समाजमाध्यमांमध्ये ‘ जाचं ऐकून मी उद्धव ठाकरे यांना दगा दिला त्याच लोकांनी माझ्यासोबत दगा केला’ असे वाक्य सत्तार यांच्या समर्थकांनी पेरायला सुरूवात केली होती. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती देण्यात आली.

खरे तर अब्दुल सत्तार हे नेहमी वादग्रस्त राहिले आहेत. कार्यकर्त्याला लाथांनी मारहाण केली म्हणून त्यांचे मंत्रीपद गेले होते. काँग्रेसमध्ये असताना अशोकराव चव्हाण यांनी सत्तार यांना बळ दिले. काँग्रेस पक्षातील निर्णय आणि सरकारचे निर्णय आपल्याच बाजूने व्हायला हवेत यासाठी कमालीचे आग्रही असणाऱ्या सत्तार यांना औरंगाबादचे तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बरेच रोखून धरले होते. त्यामुळेच त्यांनी एका बैठकीत थोरात यांच्यावर टीका केली. पुढे राधाकृष्ण विखेपाटील हे त्यांच्या टीकेच्या केंद्रस्थानी होते. आता ते त्याचे सहकारी मंत्री असणार आहेत. काँग्रेसमधील नेत्यांमध्ये आपणच केंद्रस्थानी असावे यासाठी सत्तार यांनी प्रयत्न करुन पाहिले. काँग्रेसचे सत्तेत येण्याचे गणित बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर पक्ष बदलण्याचे चातुर्य सत्तार यांच्याकडे होते. या काळात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची कमालीची स्तुती केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काढलेल्या प्रचार यात्रेच्या बसमध्येही ते चढले. पण त्यांनी शिवसेनेत जावे असा सल्ला तेव्हा भाजपकडून देण्यात आला. पुढे त्यांनी ‘शिवबंधन’ बांधले. शिवसेनेत त्यांना मंत्रीपद मिळाले. या कालावधीमध्ये प्रशासकीय यंत्रणेवर आपलीच पकड असावी अशी रचना त्यांनी करुन घेतली.

हेही वाचा- संजय राठोड : मतदारांसाठी धडपडणारा पण वादग्रस्त चेहरा

वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्येही आपला शब्द प्रमाण मानला जावा, यासाठी त्यांनी खाशी मेहनत घेतली. यातूनच महसूल विभागाशी संबंधित दोन प्रकरणांमधील गैरव्यवहार पुढे आले. वाळू ठेकेदारास कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थळ बदलून मिळणार नाही तसेच मुदत वाढवून मिळणार नाही अशा अनुक्रमे २०१३ व २०२२ मधील शासन निर्णयांची पालमल्ली करुन त्यांनी वाळू ठेकेदारास मुदतवाढ दिली होती. जमीन प्रकरणातील सुनावणीमध्येही अधिकार नसताना त्यांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले होते. न्यायालयानेही त्यांना फटकारले होते. पक्षीय राजकारणात कोणी कितीही मोठा असला तरी त्याला खूश करुन पुढे जाण्याच्या वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाठ यांचा पत्ता मात्र कापला गेला.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar is one of the controversial name in the eknath shindes new cabinet print politics news pkd
First published on: 09-08-2022 at 15:52 IST