त्रिपुरामधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आगरतळा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप रॉय बर्मन यांचा विजय झाला आहे. नुकतेच स्वगृही परतलेल्या बर्मन यांच्यासाठी हा विजय अत्यंत महत्वाचा होता. मूळचे काँग्रेमध्ये असणाऱ्या बर्मन यांनी २०१८ साली भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. आता पोटनिवडणुकीत ही जागा राखण्यात त्यांनी यश मिळवले आहे. नुकतीच त्रिपुरामध्ये चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. या  पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपाचा फक्त आगरतळा या मतदार संघात पराभव झाला आहे.५६ वर्षांचे सुदीप रॉय बर्मन हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बर्मन यांनी आपली राजकीय कारकीर्द काँग्रेससोबत सुरू केली. त्यांनी २०१६ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देऊन तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. पण तृणमूल कॉंग्रेसमध्ये त्यांचे मन फार रमले नाही. २०१७ मध्ये तृणमूल काँग्रेससोडून भाजपमध्ये प्रवेश केला. आणि आता फेब्रुवारी २०२२ मध्ये ते पुन्हा भाजपाला सोडचिट्ठी देऊन मूळ काँग्रेस पक्षात परतले. भाजपा सोडल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे आगरतळा या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुदीप बर्मन हे त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री समीर रंजन बर्मन यांचे चिरंजीव आहेत. दून येथील शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले.१९८९ मध्ये तत्कालीन त्रिपुरा अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी त्रिपुरा विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यांच्या महाविद्यालयीन काळात ते काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेशी जोडलेले होते. बर्मन यांनी १९९३ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढवली. तेव्हा त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि डाव्या पक्षांचे नेते नृपेन चक्रवर्ती यांच्याविरुद्ध आगरतळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा २६०० मतांच्या फरकाने पराभाव झाला होता. त्यापुढे मात्र त्यांनी सलग ६ निवडणुकांमध्ये एकाच मतदार संघातून विजय मिळवला. त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदसुद्धा त्यांनी भूषवले आहे. त्रिपुराविधानसभेतील विरोधी पक्षनेते मिळवण्यासाठी त्यांनी २०१६ काँग्रेसचा हात सोडला आणि तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१८ मध्ये भाजपा सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना त्यांनी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्यावर टीका केली,ल. यामुळे त्यांना एका वर्षानंतर मंत्रिपदावरून हटवण्यात आले. तेव्हापासून, बर्मन यांनी लोकांचे “बंधू” (मित्र) म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मतदारसंघात ही प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी गरजू लोकांना मदत करणे, त्यांना आर्थिक आणि आरोग्यसेवा देणे इत्यादी कामांना सुरवात केली. काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांची ‘बंधू’ प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे. 

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agartala mla sudeep roy become mla consecutively for the sixth time pkd
First published on: 28-06-2022 at 20:06 IST