नांदेड: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या २६ तारखेच्या नांदेड दौऱ्यानिमित्त खासदार अशोक चव्हाण यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चव्हाणांच्या पक्षांतरानंतरही नांदेडमध्ये काँग्रेसला लागोपाठ दोनदा मिळालेल्या विजयाने चव्हाणांचे महत्त्व कमी झाले. या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी अशोक चव्हाणांनी केली आहे.

अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपरमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे वसंत चव्हाण निवडून आले. अल्पवधीतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला असला तरी लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाला. अशोक चव्हाणांच्या पक्षांतराचा नांदेड जिल्ह्यात परिणाम जाणवला नाही अशी उघड चर्चा भाजपमध्ये सुरू झाली.

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्याची २६ मे ही तारीख आणि अशोक चव्हाणांची आमदार कन्या श्रीजयांचा वाढदिवस हा केवळ योगायोग आहे का, किंवा वाढदिवसाचे निमित्त साधत चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे वरील तारीख मागितली, ते कळाले नाही. पण शंकराव चव्हाण स्मृतीस्थळास गृहमंत्र्यांची भेट आणि भाजपाच्या बैठकीसाठी ‘भक्ती लॉन्स’ हे स्थळ टाळून ती आपल्या शिक्षण संस्थेच्या परिसरातील कुसुम सभागृहात आयोजित करणे, हा काही योगायोग नाही.

अशोक चव्हाण यांनी वरील वास्तुचे उद्घाटन आणि शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत केले होते. आता भाजपाचा एक राष्ट्रीय नेता प्रथमच चव्हाणांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात येत असून काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता आहे.