Jan Suraaj Party Candidate Resignation : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (गुरुवार) होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला (जेएसपी) मोठा धक्का बसला आहे. मुंगेर विधानसभा मतदारसंघाचे जेएसपीचे उमेदवार संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मुंगेरमधील राजकीय समीकरण बदलले असून भाजपाची बाजू बळकट झाली आहे. विशेष म्हणजे- जन सुराज पक्षाच्या चार उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याची माहिती आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

बिहारमध्ये यंदा तिरंगी लढत

बिहारमध्ये सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राज्यात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीकडे जणू नोकऱ्या, स्थलांतर आणि राजकीय आश्वासनांच्या विश्वासार्हतेबद्दलची जनमत चाचणी म्हणून पाहिले जाते आहे. पर्यायी राजकारण आणि त्यासाठी ‘जन स्व-राज्य’ अशी घोषणा किशोर यांनी केली आहे.

जन सुराज पक्ष निवडणुकीच्या आघाड्यात

‘लाभार्थी’ वाढवणाऱ्या आणि जातींची मोट बांधू पाहणाऱ्या व्यवहारवादी राजकारणाला नकार देऊन त्याऐवजी जन सुराज पक्षाला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी बिहारच्या जनतेला केले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २४३ जागा असून त्यापैकी सर्वच जागांवर प्रशांत किशोर यांनी उमेदवार दिले आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांतील उमेदवारांना विधानसभेचे तिकीट दिले आहे; पण त्यातील चार उमेदवारांनी मतदानाआधीच पक्षाची साथ सोडल्याने ‘जन सुराज’ला मोठा हादरा बसला आहे. भाजपा आमच्या उमेदवारांना धमकावून निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडत असल्याचा आरोप किशोर यांनी केला आहे.

आणखी वाचा : Amit Shah Interview : भाजपा मुस्लिमांना तिकीट का देत नाही? अमित शाहांचं रोखठोक उत्तर; नेमकं काय म्हणाले?

मतदानाआधीच जनसुराजचा उमेदवार भाजपात

गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदानाआधीच मुंगेर विधानसभा मतदारसंघातील जन सुराज पक्षाचे उमेदवार संजय सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला कुणकुण लागली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. संजय सिंह यांच्या माघारीनंतर मुंगेरमध्ये एनडीए विरुद्ध महाआघाडी असा थेट सामना रंगणार आहे. या मतदारसंघात संजय सिंह यांना मोठी लोकप्रियता असल्याने त्यांचा जनाधार एनडीएला निर्णायक आघाडी मिळवून देऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंगेर विधानसभा मतदारसंघाचे जेएसपीचे उमेदवार संजय सिंह यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. (छायाचित्र सोशल मीडिया)

जनसुराज पक्षाचे चार उमेदवार ‘माघारी

संजय सिंह यांच्याआधी जन सुराज पक्षाच्या तीन उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. पक्षाच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे तिसरा पर्याय प्रशांत किशोर यांची देण्याची रणनीती फसल्याचे पाहायला मिळत आहे. दानापूर मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार अखिलेश कुमार यांनी आपला नामांकन अर्ज वेळेत भरला नसल्याने त्यांना निवडणुकीतून बाद करण्यात आले आहे. गोपालगंजमधून शशी शेखर सिन्हा आणि ब्रह्मपूर मतदार संघातून डॉ. सत्य प्रकाश तिवारी या दोन उमेदवारांनी पक्षाला विश्वासात न घेता ऐनवेळी आपले नामांकन अर्ज माघारी घेतले आहे. मुंगेर विधानसभा मतदारसंघात जन सुराजला सर्वात मोठे नुकसान झाले. संजय सिंह यांनी थेट भाजपप्रणित एनडीएमध्ये प्रवेश केला आहे.

हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय; १२२ पैकी ९१ जागा बिनविरोध जिंकल्या, काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव

प्रशांत किशोर यांचा आरोप काय?

प्रशांत किशोर यांनी उमेदवारांच्या या माघारीमागे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला होता. भाजपाकडून जन सुराज पक्षाच्या अनेक उमेदवारांना धमकावले जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी दानापूर मतदारसंघाचा दाखला देत पत्रकार परिषदेत एक फोटोही दाखवला होता. “आमचे उमेदवार अखिलेश शाह नामांकन अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचू शकले नाही. राजदच्या गुंडांनी त्यांचे अपहरण केले असे सांगण्यात आले. परंतु त्यांचे अपहरण झाले नसून उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर होते. गृहमंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून त्यांना आपल्याबरोबर बसवून ठेवले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते.

बिहारच्या निवडणुकीत कोण मारणार बाजी?

बिहारमध्ये दोन टप्प्यांत (६ आणि ११ नोव्हेंबर) मतदान झाल्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी इतकी आहे. यंदा २४ जूनपर्यंत ही संख्या ७.८९ कोटी होती. मात्र, मसुदा यादीतून ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात सत्तास्थापन केली होती, त्यावेळी महाआघाडीनेही कडवी झुंज दिली होती. यंदाच्या तिरंगी लढतीत कोणता पक्ष बाजी मारणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून आहे.