Bihar Assembly Elections 2025 Nitish Kumar : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीची अखेर घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी पत्रकार परिषद घेत बिहारची निवडणूक जाहीर केली. पंधरा वर्षांनंतर राज्यात दोन टप्प्यांत ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल; तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. या निवडणुकीनंतर बिहारच्या राजकारणातील एका युगाचा अंत होण्याची शक्यता आहे. जनता दल युनायटेडचे प्रमुख आणि पाचवेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले नितीश कुमार यांची ही शेवटची विधानसभा निवडणूक असल्याचे मानले जात आहे.

नितीश कुमार यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाचे संस्थापक लालू प्रसाद यादव यांनी आपले राजकीय उत्तराधिकारी म्हणून पक्षाची धुरा तेजस्वी यादव यांच्या हाती सोपवली आहे. २०२० च्या निवडणुकीतील अनपेक्षित कामगिरीत आणखी सुधारणा करून तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवण्याची आशा बाळगून आहेत. महाआघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) या दोन्ही पक्षांनाही बिहारची सत्ता मिळवण्याची आशा आहे. त्याशिवाय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्षाचाही (जेएसपी) या निवडणुकीतून उदय होण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार यांच्या तब्येतीवरून राजकीय घमासान

बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे सध्या ७४ वर्षांचे आहेत. त्यांचे आरोग्य सध्या उत्तम नसल्यामुळे महाआघाडीने हा मुद्दा राजकीय केला आहे. नितीश यांचे आता प्रशासनावर नियंत्रण राहिलेले नाही आणि राज्याचा कारभार दुसरेच लोक चालवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तेजस्वी यादव सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हिडीओ शेअर करून हा मुद्दा अधोरेखित करीत आहेत. “नितीश कुमार यांना आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे, त्यांनी आपली राजकीय इनिंग पूर्ण केली आहे,” असे महाआघाडीतील घटकपक्ष विकासशील इंसान पार्टीचे प्रमुख मुकेश सहनी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

आणखी वाचा : Sambhal Mosque Demolition : बुलडोझर कारवाईच्या भीतीने मुस्लिमांनी स्वतःच पाडली मशीद; संभलमध्ये नेमकं काय घडलं?

दुसरीकडे, जनता दल युनायटेड पक्षाकडून विरोधकांचे सर्व दावे सातत्याने फेटाळून लावले जात आहेत. नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाईल, असे भाजपाचे नेतेही ठामपणे सांगत आहेत. मात्र, निवडणुकीनंतर नेतृत्वात कोणते बदल होतील याबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. नितीश यांनी गेल्या १९ वर्षांत बिहारला विकासाच्या मार्गावर नेले. त्यांच्या याच प्रतिमेमुळे भाजपाकडून सावध भूमिका घेतली जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

बिहारमधील मतदारांवर योजनांचा पाऊस

बिहारमधील सत्ता विरोधाची लाट थोपवण्यासाठी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मतदारांवर अनेक योजनांचा पाऊस पाडला आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत राज्यातील सुमारे १ कोटी २१ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील १.८९ कोटी कुटुंबांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. सामाजिक सुरक्षा पेन्शन दरमहा ४०० रुपयांवरून १,१०० रुपये करण्यात आली आहे. अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. १८ ते २५ वयोगटातील बेरोजगार तरुणांसाठी दोन वर्षांपर्यंत दरमहा १,००० रुपये भत्ता देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

‘मतचोरी’ विरुद्ध ‘घुसखोरी’, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस मतदार असल्याचा दावा भाजपाने केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने बिहारमध्ये मतदारांची विशेष फेरतपासणी मोहीम राबवली. विरोधकांनी या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत हा मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आरजेडीचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी १७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ दरम्यान बिहारमध्ये मतदार अधिकार यात्राही काढली. त्यावेळी महाआघाडीच्या या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचे रुपांतर मतदानात होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पलटवार करत महाआघाडी घुसखोरांना पाठिंबा देत असल्याची टीका केली.

मोदींचा चेहऱ्यावर लढवली जाणार निवडणूक?

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे घोषित केले. मात्र, असे असले तरी प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचा मुद्दा निवडणूक प्रचारात मांडला जाण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने मोदींच्या नावावरच मते मागितली जातील, असे भाजपातील एका सूत्राने दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. दुसरीकडे, राहुल गांधी हेदेखील काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत असल्याने दोन राष्ट्रीय नेत्यांमध्ये पुन्हा एकदा थेट सामना पाहायला मिळेल. भाजपाचे नेते व बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांना राज्यव्यापी प्रभाव नसल्याचे सांगितले जाते. जनता दल युनायटेडचे संजय कुमार झा आणि राजीव रंजन सिंह हेही तुलनेने कमी लोकप्रिय नेते मानले जातात.

हेही वाचा : नितीश कुमार सत्ता राखणार की तेजस्वी यादव, प्रशांत किशोर करणार खेळखंडोबा? कसे असेल बिहार निवडणूकीचे चित्र?

प्रशांत किशोर फॅक्टरचा कुणाला बसणार फटका?

राजकारणात प्रवेश केल्यानंतर प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने (जेएसपी) पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकीय चर्चेत ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांवर केलेल्या थेट आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांना बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे. बिहारच्या जातीय आधारित राजकारणाला कंटाळलेले अनेक मतदार किशोर यांच्याकडे आशेने पाहत आहेत. जनसुराज्य पक्षाचे सरकार आल्यास स्थलांतर आणि बेरोजगारीसारख्या मूळ समस्यांचे निराकरण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. प्रशांत किशोर यांचा पक्ष आगामी निवडणुकीत कुणाची मते खाणार, याची उत्सुकता अनेकांना लागून आहे. राज्यातील मतदारांना सत्तापरिवर्तन हवे असून जन सुराज्य पक्षाला निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, असा दावा प्रशांत किशोर यांच्याकडून केला जात आहे.