Bihar election 2025 बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आहेत. आता चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या युतीची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे, बिहारमधील भाजपाचे गणित बिघडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चर्चेचे कारण काय? युतीच्या चर्चेवर प्रशांत किशोर काय म्हणाले? जाणून घेऊयात…

नव्या युतीचे संकेत

  • “पुढील महिन्यात पार पडणाऱ्या बिहार निवडणुकीसाठी चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या युतीची शक्यता नाकारता येत नाही, कारण राजकारणात दरवाजे नेहमी उघडे असतात,” असे लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) सूत्रांनी मंगळवारी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.
  • एलजेपी आणि सत्ताधारी भाजपा यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू असताना, पासवान आणि निवडणूक रणनीतिकार-राजकारणी किशोर यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
  • गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भरभरून यश मिळालेले चिराग पासवान यंदाच्या निवडणुकीत बिहारच्या एकूण २४३ विधानसभा जागांपैकी ४० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे, तर भाजपा फक्त २५ जागा देण्यास तयार आहे.
  • परंतु, असे असले तरी ही युती होण्याची शक्यता फार कमी आहे. यावर स्वतः प्रशांत किशोरदेखील बोलले आहेत.

काय म्हणाले प्रशांत किशोर?

‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांना या युती संदर्भात प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी डाळ-भात खाणारा व्यक्ती आहे, खिचडी खाणारा नाही. मी खिचडी खात नाही आणि बनवत सुद्धा नाही. चिराग पासवान यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे आणि अजूनही करतो, कारण ते बिहारमध्ये धर्म आणि जातीचे राजकारण करत नाहीत.”

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “परंतु,चिराग पासवान भाजपाबरोबर लढत आहेत. चिराग पासवान बिहारबद्दल बोलतात पण त्यासाठी उभे राहत नाहीत. जर त्यांनी एनडीएच्या बाजूने निवडणूक लढवली तर ते आणि आम्ही आमने-सामने असू. त्यांना २० जागा मिळतील की २५ जागा मिळतील, हे आम्हाला माहित नाही, पण त्यांना कितीही जागा मिळाल्या तरी ते आणि आम्ही आमने-सामने असू. मग, इथे तडजोड करण्याचा प्रश्नच कुठे येतो?,” असे ते म्हणाले आणि युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला. राजकीय समीकरणे बघताही ही युती होणे शक्य असल्याचे दिसत नाही.

युती होणे शक्य का नाही?

पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या व्यक्तीशी युती केल्याने पासवान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षेला धक्का लागण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड आणि विरोधी गटातून २०२० च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाकडून (आरजेडी) इतक्या जागा खेचून आणणे, संभाव्य एलजेपी-जन सुराज युतीसाठी खूप मोठे आव्हान असेल.

परंतु किशोर यांच्याबरोबर युतीच्या चर्चांमुळे भाजपावर जागावाटपासाठी थोडा अधिक दबाव पडू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलजेपी राज्यातील काही प्रतिष्ठित जागा मिळवण्यासाठीदेखील आग्रही आहे. पासवान यांनी स्वतः गेल्या महिन्यात ‘एनडीटीव्ही’ला सांगितले होते की, “मला प्रतिष्ठित जागा हव्या आहेत.” पासवान यांनी मित्रपक्षांना एक छुपा इशाराही दिला होता. त्यांनी ‘एनडीटीव्’हीला सांगितले की “मी भाजीवरील मीठासारखा आहे. मी प्रत्येक मतदारसंघात २० ते २५ हजार मतांवर परिणाम करू शकतो आणि जोपर्यंत मी युतीचा सदस्य आहे, तोपर्यंत माझ्याकडे बाहेर पडण्याचा पर्याय नेहमीच उपलब्ध आहे.”

भाजपा सूत्रांनी जागावाटपाच्या चर्चेबद्दल सांगितले की, निवडणुकीच्या तारखा जाहीर होईपर्यंत चर्चा पुढे ढकलण्याचा निर्णय हा एक रणनीतिक डाव आहे, यामुळे ज्या नेत्यांना तिकीट मिळत नाही त्यांचे शेवटच्या क्षणी पक्षांतर थांबवता येईल. दरम्यान, भाजपा आणि जेडीयू यांनी राज्याच्या २४३ जागांपैकी २०० जागा आपापसात वाटून घेण्याचे मान्य केले आहे आणि पासवान यांच्यासह इतरांसाठी उरलेल्या जागा सोडल्या आहेत, या बातम्या एलजेपी सूत्रांनी फेटाळून लावल्या आहेत. “कोणत्याही नेत्याने याची घोषणा केली आहे का?” असे सूत्रांनी विचारले. तसेच हेदेखील निदर्शनास आणून दिले की, चर्चा फक्त भाजपाबरोबर होईल, जनता दल युनायटेडबरोबर नाही. यावरून नितीश कुमार यांच्या पक्षाबरोबरच्या संघर्षाचा हा आणखी एक संकेत आहे.

निवडणुकीआधीच्या सर्व्हेत जनतेचा कल कुणाकडे?

सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, पुढील निवडणुकीत जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वोच्च पसंती नाहीत. नितीश कुमार हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे. राजकीय विश्लेषक आणि काही वर्षांपूर्वी राजकारणात उतरलेल्या प्रशांत किशोर यांना दुसऱ्या क्रमाकांची पसंती देण्यात आली आहे.

प्रशांत किशोर यांनी बिहारच्या सर्व २४३ विधानसभा जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. नितीश कुमार हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तर चौथ्या स्थानावर बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव आहे. बिहारमधील लोजप (रामविलास) पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री, एनडीएतील भागीदार चिराग पासवान यांना पाचव्या क्रमाकांची पसंती मिळाली आहे.