Bihar election 2025 बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मागील निवडणूक २०२० मध्ये झाली होती. या निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवले होते आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. यंदाही मुख्य सामना एनडीए आणि महाआघाडीत होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यात प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्षही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. एनडीए पुन्हा सत्तेत आल्यास भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री, भाजपा नेते सम्राट चौधरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणूक अजेंडा, नितीश कुमार यांचे नेतृत्व, आरजेडी नेते तेजस्वी यादव यांचे आव्हान आणि जनसुराजचे नेते प्रशांत किशोर यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी आपले मत मांडले आहे.
बिहार निवडणुकीसाठी एनडीएचा आराखडा काय?
सम्राट चौधरी एनडीएच्या आराखड्याविषयी बोलताना म्हणाले, “भाजपा लवकरच आपला जाहीरनामा घेऊन येईल. पुढील पाच वर्षांच्या आराखड्यावर समन्वय साधण्यासाठी आम्ही आमच्या मित्रपक्षांशीही बोलत आहोत. विकासाची अपूर्ण आश्वासने आम्हाला पूर्ण करायची आहेत. कारण- १९६५ ते २००५ या काळात बिहारच्या विकासात अडथळा निर्माण झाला होता. आम्हाला युवक आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक काम करायचे आहे.” ते पुढे म्हणाले, “पुढील पाच वर्षांत २० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याचा आमचा मानस आहे. आमच्याकडे फक्त ७,२८२ एकर जमीन राखीव होती; पण अलीकडेच आम्ही १४,००० एकर जमीन खरेदी केली आहे. आमच्या संभाव्य गुंतवणूकदारांची गरज पूर्ण करण्यासाठी येत्या काही वर्षांत ५०,००० एकर जमिनीवर भूखंड तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
एनडीएचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
“एनडीएमध्ये कोणतीही जागा रिक्त नाही. नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत आणि पुढेही मुख्यमंत्री राहतील,” अशी भूमिका सम्राट चौधरी यांनी स्पष्ट केली. २००५ च्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांना भाजपानेच पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुढे केले होते. आमचे सर्वोच्च नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी या कल्पनेला हिरवा कंदील दिला होता, असे ते म्हणाले. “नितीशजींची विचारधारा कदाचित वेगळी असेल; पण ते एनडीएच्या सर्व मित्रपक्षांना मान्य आहेत यात दुमत नाही. हा चर्चेचा विषयच नाही,” असेही ते म्हणाले.
भाजपा नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही?
जर एनडीए पुन्हा सत्तेत आले, तर भाजपा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करणार नाही, असा दावा विरोधकांनी केला आहे . त्यावर सम्राट चौधरी म्हणाले, “नितीश कुमार २९ वर्षांपासून भाजपबरोबर आहेत. लालू प्रसाद आणि नितीश या दोघांनाही मुख्यमंत्री करण्यात भाजपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लालू सहा महिन्यांत बदलले (१९९० मध्ये, जेव्हा एल. के. अडवाणींच्या यात्रेपूर्वी भाजपाने लालूंच्या नेतृत्वाखालील जनता दल सरकारचा पाठिंबा काढला होता); पण नितीश कुमार आमच्याबरोबर राहिले. त्यांच्याविरोधात कोणी असण्याचे कारण काय?,” असा प्रश्नही त्यांनी केला.
तेजस्वी यादवांच्या घोषणा अन् एनडीएच्या महिला मतदारांमध्ये फूट
तेजस्वी यादवांनी महिलांसाठी केलेल्या घोषणांवर सम्राट चौधरी म्हणाले, “निवडणुकीपूर्वी घोषणा करण्याचा सर्व राजकीय पक्षांना पूर्ण अधिकार आहे. पण, आमच्या सरकारने इयत्ता नववीच्या मुलींसाठी सायकल योजना सुरू केली, ज्यामुळे सामाजिक परिवर्तन आले. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत आम्ही आतापर्यंत १.४१ कोटी संभाव्य महिला उद्योजकांना प्रत्येकी १०,००० रुपये हस्तांतरित केले आहेत.”
प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे तेजस्वी यांचे आश्वासन निवडणुकीचे चित्र बदलणार?
सम्राट चौधरी म्हणाले, “२०२० च्या निवडणुकीत चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह एनडीएचा भाग नसल्यामुळे आमची मते विभागली गेली होती. यावेळी ते आमच्याबरोबर आहेत. त्यांनी (तेजस्वींनी) दिलेले आश्वासन व्यवहार्य नाही. त्यांनी आकडेमोड केली आहे का? आमचे वार्षिक बजेट फक्त ३.१७ लाख कोटी आहे, त्यापैकी केवळ ६५,००० कोटी राज्याच्या स्वतःच्या महसुलातून येतात.” ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी (केंद्र सरकार) आम्हाला दोन लाख कोटी रुपये (विशेष साह्य आणि केंद्रीय करांमधील राज्याचा वाटा म्हणून) देतात. आकडेवारी दर्शवते की, लालू प्रसाद आणि राबडी देवी यांच्या सरकारांनी फक्त ९४,००० नोकऱ्या दिल्या; तर नितीश कुमार सरकारने गेल्या २० वर्षांत सुमारे १८.५ लाख नोकऱ्या दिल्या आहेत.”
पंतप्रधान मोदी वारंवार ‘जंगलराज’चा उल्लेख का करतात?
चौधरी म्हणाले, “लोकांना ‘पौर्णिमा’ आणि ‘अमावास्या’मधील फरक सांगण्यासाठी त्यांना ‘जंगलराज’ची आठवण करून देणे खूप महत्त्वाचे आहे. नितीश प्रकाशाचे प्रतिनिधित्व करतात आणि लालू अंधाराचे. आम्हाला लोकांना त्या अंधाऱ्या दिवसांची आठवण करून देण्याची गरज आहे.
प्रशांत किशोरांचे निवडणुकीतील महत्त्व
“पक्ष येतात आणि जातात. एआयएमआयएम, बसपा आणि आता जनसुराज पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवणार आहे. प्रशांत किशोर यांच्या स्थलांतरावरील मुद्द्यामुळे कोणतेही नवे कथानक तयार होत आहे, असे मला वाटत नाही. खरे तर, स्थलांतर सध्या ११ टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या काही वर्षांत गावांकडून लहान आणि मोठ्या शहरांकडे होणारे स्थलांतर मंदावले आहे. ग्रामीण भागात लघु उद्योग उभे राहत आहेत. २००५ पूर्वी जीडीपीमध्ये नकारात्मक वाटा असणाऱ्या उद्योगाचे योगदान आता आमच्या जीडीपीमध्ये २३ टक्के आहे. चांगल्या वाढीसाठी येत्या काही वर्षांत उद्योगाचा जीडीपीतील वाटा ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे सम्राट चौधरी म्हणाले.
वयाबाबत केलेल्या आरोपांवर चौधरी काय म्हणाले?
सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ते म्हणाले, “तारापूर हे माझे मूळ गाव आहे. मला घरी परतलेल्या मुलासारखे वाटत आहे. माझे वडील शकुनी चौधरी यांनी १९८५ ते २०१० पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९९८ ते २००० हा काळ वगळता, माझे वडील लोकसभेत गेल्यावर माझ्या आई पार्वती देवींनी प्रतिनिधित्व केले. मी निवडणुकीच्या रिंगणात नवीन नाही. मी २००० ची निवडणूक लढवली होती; पण निवडणूक लढवताना माझे वय कमी असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माझी निवडणूक रद्द झाली होती. पण मी हे स्पष्ट करतो की, माझी जन्मतारीख १६ नोव्हेंबर १९६८ आहे. भारतीय निवडणूक आयोग हे अंतिम निवडणूक प्राधिकरण आहे. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही.” ते म्हणाले, “१९९८ ते २००३ या काळात माझे वय आणि इतर गोष्टींवरून मला खूप लक्ष्य केले गेले. २००५ पासून माझी राजकीय कारकीर्द सुरळीत सुरू असल्याने, काही लोक जुन्या गोष्टी उकरून काढत आहेत; पण मला चिंता नाही.”
किशोर यांच्या आरोपांवर चौधरी काय म्हणाले?
सम्राट चौधरी म्हणाले, “काही कारणांमुळे मी माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्यामुळे मी कामराज विद्यापीठातून प्री-फाउंडेशन कोर्स केला. हा कोर्स करण्यासाठी तमीळ भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असले तरी हिंदी जाणणारी व्यक्तीही हा कोर्स करू शकते. मी २००८-२०१० दरम्यान हा कोर्स केला आणि २०११ मध्ये त्याचा निकाल लागला. हा कोर्स तमिळनाडूव्यतिरिक्त काही राज्यांमध्ये १२वीच्या बरोबरीचा आहे. मला २०१९ मध्ये ‘कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटी’कडून डी.लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यात लपवण्यासारखे काही नाही.”
