Bihar election 2025 बिहारमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जागावाटप घोषित केल्यामुळे विरोधकांच्या महाआघाडीवर जागावाटपासाठी दबाव वाढला आहे. जागावाटपावरून महाआघाडीत अंतर्गत वाद सुरू असल्याचे चित्र आहे. महाआघाडीचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा महाआघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या निर्णयामागील कारण काय? महाआघाडीतील जागावाटपाचा वाद काय? जाणून घेऊयात…

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने सोडली साथ

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीबरोबर निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी स्पष्ट केले की, आरजेएलपी आगामी निवडणुका ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाबरोबर युती करून लढवेल. यापूर्वी, गेल्या आठवड्यातही पशुपती पारस यांनी आपला पक्ष ‘महाआघाडीचा भाग होणार नसल्याचे संकेत दिले होते. तसेच आरजेएलपी कोणत्याही युतीमध्ये सामील व्हायचे की नाही यावर निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. बिहार विधानसभेच्या दोन टप्प्यांतील निवडणुका ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी होणार आहेत.

राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्षाने (आरएलजेपी) बिहार निवडणुकीत महाआघाडीबरोबर निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. (छायाचित्र-पीटीआय)

महाआघाडीत फूट

महाआघाडीमधील मित्रपक्षांबरोबर जागावाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत असताना, काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. पक्षाच्या बिहार युनिटने जाहीर केल्यानुसार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम हे कुटुंबा (Kutumba) विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. काँग्रेसचे नेतृत्व राष्ट्रीय जनता दलासह (आरजेडी) आपल्या मित्रपक्षांशी बोलणी करत आहे, पण जागावाटप व्यवस्था अद्याप अंतिम झालेली नाही किंवा जाहीरही करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बुधवारी राघोपूर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याच वेळी ही घडामोड समोर आली.

पक्षाचे प्रमुख पशुपती कुमार पारस यांनी स्पष्ट केले की, आरजेएलपी आगामी निवडणुका ओवेसींच्या एआयएमआयएम पक्षाबरोबर युती करून लढवेल. (छायाचित्र-पीटीआय)

बुधवारीही ‘इंडिया’आघाडीला जागावाटपाची सार्वजनिक घोषणा करता आली नाही. मात्र, असे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वोच्च नेते तेजस्वी यादव यांच्यासह काही उमेदवारांनी आपले अर्ज भरले. याचदरम्यान, काही जागांवर मित्रपक्षांमध्येच ‘मैत्रीपूर्ण लढती’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसला ६१ जागा मिळाल्या आहेत, त्यापैकी दोन जागा आयपी गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया इन्क्लुझिव्ह पार्टी’ला दिल्या जातील, तर काँग्रेस आणखी दोन जागांसाठी आग्रह धरत आहे. इतर पक्षांना किती जागा मिळाल्या, याची माहिती सध्या उपलब्ध नाही.

महाआघाडीमधील मित्रपक्षांबरोबर जागावाटपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत असताना, काँग्रेस पक्षाने बुधवारी रात्री निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली. (छायाचित्र-पीटीआय)

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यात कहलगाव, वैशाली आणि नरकटगंज या जागांवरून संघर्ष सुरू होता आणि यापैकी कोणतीही जागा सोडण्यास दोन्ही पक्ष तयार नव्हते. सूत्रांनी सांगितले की, मुकेश साहनी यांच्या नेतृत्वाखालील ‘विकासशील इन्सान पार्टी’ला सुमारे १७-१८ जागा देण्यावर व्यापक सहमती झाली आहे. राष्ट्रीय जनता दलाकडून देऊ केलेल्या १९ जागांपैकी, ज्या १८ जागांवर सहमती झाली आहे, त्यावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) (CPI(ML)L) च्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यात कहलगाव, वैशाली आणि नरकटगंज या जागांवरून संघर्ष सुरू होता आणि यापैकी कोणतीही जागा सोडण्यास दोन्ही पक्ष तयार नव्हते. (छायाचित्र-पीटीआय)

या डाव्या पक्षाने किमान ३० जागांची मागणी केली असली तरी त्यांना ३ ते ४ अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. युती व्यवस्थापकांनी मांडलेल्या एका तर्कानुसार, ‘व्हीआयपी’ व ‘जेएमएम’ यांसारख्या पक्षांच्या प्रवेशामुळे सर्व पक्षांना काही जागा सोडाव्या लागल्या आहेत. सोमवारपासूनच ‘इंडिया’आघाडी जागावाटपाचा करार जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आघाडीने ज्या जागांवर समझोता झाला आहे, त्यावर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

फक्त ‘इंडिया’ आघाडीलाच जागावाटपात अडचणींचा सामना करावा लागला आहे, असे नाही. ‘एनडीए’ने रविवारी ‘एक्स’ पोस्टद्वारे जागावाटप जाहीर केले होते, पण सोमवारी नियोजित असलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात आली, कारण या युतीमध्येही अडचणी वाढल्या होत्या. विशेषतः ‘एलजेपी’ला २९ जागा देण्यावरून हा तणाव निर्माण झाला होता. जनता दल युनायटेड (जेडीयू), उपेंद्र कुशवाह यांचा आरएलएसपी, तसेच जीतन राम मांझी यांचा पक्ष नाराज होते.