नागपूर : काँग्रेसवर “पराभूत मानसिकता” असल्याची टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता स्वतःच बंडखोरीच्या सावटाखाली सावध पावले उचलायला सुरुवात केली आहे. सत्ता, संघटना आणि साधनसंपत्ती असूनही भाजपला घरातील असंतोषाची भीती अधिक आहे. इच्छुकांची प्रचंड गर्दी, मित्रपक्षांशी जागा वाटपाचे समीकरण, आरक्षण यामुळे एखाद्याला तिकीट मिळाले नाही तर तो बंडखोरी करू शकतो या भीतीने सध्या भाजपला ग्रासले आहे.

ही संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी भाजपला स्वीकृत सदस्य नियुक्तीचे गाजर आणि तुचे फोन र्सर्व्हिलन्सवर आहे, असे कार्यकर्त्यांना सांगावे लागत आहे. यावरूनच पक्ष बंडखोरच्या भीतीने किती ग्रासला आहे याचे संकेत मिळतात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती) निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातल्या आहेत. या निवडणुका स्थानिक पातळीवर पक्ष संघटनेच्या ताकदीची खरी कसोटी असतात. यामध्ये तिकीट वाटप, गटबाजी, नाराजी आणि बंडखोरी हे घटक निर्णायक ठरतात. विदर्भात सध्या या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षानी वेग दिला आहे.

काँग्रेसकडून भाजपला मतचोरीच्या मुद्यावरून लक्ष केले जात आहे तर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपकडून काँग्रेस पराभूत मानसिकतेचा पक्ष आहे, असे उत्तर दिले जात आहे. नागपूर आणि अमरावती या विदर्भातील दोन राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत. त्यांची वरील निवडणुकीच्या संदर्भातील दोन विधाने सध्या चांगलीच चर्चेत आहे.

भाजपची सध्याची स्थिती

भाजपकडे सध्या राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. तसेच संघटनात्मक आणि आर्थिक पाठबळही मजबूत आहे. पण हीच ताकद त्यांच्यासाठी सध्या आव्हान ठरली आहे.कारण प्रत्येक तालुक्यात, शहरात तिकीटासाठी अनेक इच्छुक आहेत. प्रत्येक जागेसाठी अनेक दावेदार, आणि त्यात मित्रपक्षांना काही जागा सोडाव्या लागणार,परिणामी नाराजी आणि अंतर्गत बंडखोरीची शक्यता वाढली आहे. भाजपला सध्या खरी भीती काँग्रेसची नाही, तर आपल्या घरातील असंतोषाची आहे.ज्या पक्षाकडे सत्ता, पैसा आणि संघटना आहे, त्या पक्षात सर्वाधिक आकांक्षा आणि अपेक्षा असतात.त्या पूर्ण न झाल्यास बंडखोरी अपरिहार्य होते

बावनकुळे यांची विधाने – संकेत की सावधगिरी ?

राज्याचे महसूल मंत्री आणि विदर्भातील नागपूर व अमरावती या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलीकडेच केलेलीदोन महत्त्वाची विधाने ही भाजपला बंडखोरीच्या भीतीने किती ग्रासले आहे याचे संकेत देणारी आहेत. त्यापैकी पहिले विधान हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्याबाबत होते. ज्यांना आरक्षणामुळे किंवा अन्य कारणांमुळे निवडणुकीची संधी मिळाली नाही, त्यांना स्वीकृत सदस्यत्व देण्याचे सुतोवाच यातून करण्यात आले आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढून बंडखोरी टाळणे किंवा त्यांना इतर पक्षात जाण्यापासून रोखणे हाच उद्देश यामागचा असावा असे दिसते.

भंडारा येथील मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी “कार्यकर्त्यांना तुमचे फोन सर्व्हिलन्सवर आहेत” असे सांगणे हा त्यांना एकप्रकारे दिलेला इशाराच समजला जातो.हे वक्तव्य उघडपणे शिस्त लावण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.त्यावरूनच पक्षात संभाव्य नाराजी किती गंभीर आहे, याची कल्पना येते. या विधानावर टीका झाल्यानंतर बावनकुळे यांनी ‘वक्तव्याचा विपर्यास झाला’ असा खुलासा केला, पण राजकीय निरीक्षकांच्या मते हे भाजपच्या अंतर्गत चिंतेचं प्रकटीकरण होते.

मुख्यमंत्र्यांनाही भीती

आगामी निवडणुकांमध्ये बंडखोरी होण्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वाटते. दोनच दिवसापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या दिवाळीमीलन कार्यक्रमात त्यांनी ती बोलूनही दाखवली.“बंडखोरी टाळण्यासाठी आम्ही मित्र पक्षांसोबत निवडणुकीनंतर युती करणार आहोत.” हे त्यांचे विधान अत्यंत राजकीय संकेतात्मक आहे. भाजपला अंतर्गत असंतोषाची जाणीव आहे हे यातून दिसून येते. निवडणुकीपूर्वी एकजूट साधणं कठीण असल्याने ‘नंतर युती’चा मार्ग त्यानी खुला ठेवला आहे.