सांगली : महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी जिल्ह्यात भाजप अंतर्गत असलेली गटबाजी, वाद उफाळून येत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारी वाटप करताना नव्याने पक्षात आलेल्यांचाही विचार केला जाईल असे सांगितल्यानंतर सांगलीच्या आमदारांनी निष्ठावंतांचे काय, असा सवाल करून यासाठी आपण आग्रही राहू अशी जाहीर भूमिका घेतली तर मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी सावध पवित्रा घेतला असला तरी गेल्या एक महिन्यापासून मिरज मतदार संघातील विविध विकास कामाच्या उद्घाटनापासून पालकमंत्री पाटील अलिप्तच राहिल्याचे दिसून आले. यामुळे भाजपचे आज वेगाने काँग्रेसीकरण झाल्याचे चित्र असून याचा फटका बसतो की लाभ होतो हे निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे.
पालकमंत्री पाटील आठवड्यातून दोन काही वेळा तीन दिवस सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर असतात. शासकीय बैठकांचे आयोजन यावेळी करण्यात येत असले तरी या बैठकापेक्षा अधिक वेळ कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देण्यावर अधिक भर असतो. यातून भाजपचा विस्तार अधिक गतीने होत असल्याचे दिसत आहे. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील, जेष्ठ नेते अण्णा डांगे, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील आदींच्या भाजप प्रवेशात याचे रूपांतर झाले. भाजपमध्ये महत्वाच्या नेत्यांचे प्रवेश घडवून आणत असताना त्यांना प्रामुख्याने जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार यांची मोठी मदत झाली हे सर्वश्रूत आहे.
सांगली व मिरज हे भाजपचे गड मानले जातात. गेल्यावेळी महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेतही भाजपने सत्ता मिळवली होती. आताही मुंबई, दिल्लीत पक्षाची सत्ता असताना आयारामांची गरजच काय असा सवाल पक्षातील निष्ठावंत गटाला पडला आहे. पक्ष विस्तार करायचा तर शब्द देउन कशासाठी असा सवाल केला जात आहे. यातून पक्षात गर्दी वाढल्याने पक्षाचे निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना असुरक्षित वाटत आहे. याचाच परिणाम म्हणून आमदार गाडगीळ यांनी खुले पत्र प्रसिध्द करून मी तिसर्यांदा आमदार म्हणून निवडून आलो असल्याने माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर उमेदवारी वाटपामध्ये अन्याय होउ देणार नाही असे सांगावे लागले.
यावर मंत्री पाटील यांनीही निष्ठावंतावर अन्याय होणार नाही असा खुलासा करत असतानाच भाजपच्या ४३ जागा कायम राहतील, आणि श्रीमती पाटील यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या सहा माजी नगरसेवकांचाही विचार केला जाईल असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
मुळात हा वाद जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून निर्माण झाला आहे. यामागे प्रदेश उपाध्यक्ष इनामदार यांचा हात असल्याचा संशय गाडगीळ गटाला आहे. यातून भविष्यातील आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार म्हणून इनामदार यांच्याकडे पाहिले जात असून त्यातूनच एकमेकांना शह-काटशह देण्याचे राजकारण भाजपमध्ये पडद्याआड शिजत आहे. यातूनच पालकमंत्री पाटील यांच्या तोंडी वक्तव्ये देउन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खुद्द आमदार गाडगीळ यांनी केला आहे. आता यातून पक्षांतर्गत मतभेद समोर तर आले आहेतच, पण याचबरोबर महापालिका निवडणुकीमध्ये निवडून आणण्यापेक्षा शत्रूचा शत्रू तो मित्र या पध्दतीने एकमेकांचे मोहरे गारद करण्याचे प्रयोजनही होउ शकते.
