नागपूर: विदर्भातील कामठीचे विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांना पहिल्या यादीत डच्चू दिल्यानंतर भाजप आता पश्चिम विदर्भातील तीन विद्यमान आमदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. त्या जागांसाठी पर्यायी उमेदवारांचा पक्ष प्रवेशही तातडीने आटोपण्यात आला आहे. भाजपची विदर्भातील भाकरी फेर मोहिम पक्षाला फायद्याची ठरणार की यामुळे असंतोष वाढून भाकरीच करपणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने विदर्भातील सर्व ६२ जागांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यात शिंदे गटासाठी सोडलेल्या पाच जागांचाही समावेश आहे. पक्षाची पहिली यादी मागील रविवारी जाहीर केली.त्यात जाहीर ९९ उमेदवारांपैकी विदर्भातील २३ उमेवारांचा समावेश होता.त्यात १७ विद्यमान आमदार होते. मात्र कामठीचे आमदार टेकचंद सावरकर यांचे नाव यादीत नव्हते. त्यांच्याऐवजी पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. विदर्भातील १० विद्यमानआमदारांना पुन्हा उमेदवारी द्यायची की भाकरी फिरवायची? याबाबतचा निर्णय झाला नव्हता. त्यामुळे पहिल्या यादीत त्यांची नावे नव्हती. यापैकी पश्चिम विदर्भातील तीन आमदारांचा समावेश होता त्याना तिकीट द्यायची नाही,असा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ. संदीप धुर्वे, वाशीमचे आमदार लखन मलिक आणि मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे यांचा समावेश आहे.

हे ही वाचा… सांगलीत भाजपचे दोन नेते उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत

आर्णीत धुर्वे यांच्याऐवजी माजी आमदार राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तोडसाम यांनी भाजपकडून एकदा या मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०१९ मध्ये त्यांनी बंडखोरी केली व पराभूत झाले होते. मधल्या काळात त्यांनी भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला होता. तोडसाम यांचा नागपुरात शुक्रवारी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. विशेष म्हणजे तोडसाम यांना पक्षात घेण्यास भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांचा विरोध होता. तो डावलून त्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

वाशीममध्ये विद्यमान आमदार लखन मलिक यांच्याऐवजी श्याम खोडे यांना तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये हरिष पिंपळे यांच्या ऐवजी हरिश राठी यांना उमेदवारी देण्यात येणार आहे . राठी यांचाही शुक्रवारीच नागपुरात भाजप प्रवेश झाला.

भाकरी फिरवल्याचा फायदा होणार का ?

भाजपने पश्चिम विदर्भातील तीन उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याला स्थानिक पातळीवर नेत्यांचा विरोध असल्याने भाजपला किती फायदा होतो की भाकरीच करपते हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे ही वाचा… भाजप उमेदवारीचा तिढा दिल्ली दरबारी! मलकापूरमधून संचेती व लखानी यांच्यात चुरस

मध्य नागपूरमध्ये बदल?

नागपूरमध्ये अद्याप मध्य नागपूर या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही. ते सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. तरीही त्यांच्याऐवजी नवा उमेदवार देण्याची शक्यता आहे.

अजित पवारांच्या आमदाराला भाजपचा विरोधी

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार हे अजित पवार यांच्या गटात आहे आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी गट महायुतीत आहे. युतीच्या जागावाटप सुत्रांनुसार विद्यमान आमदारांना जागा सोडली जाते. त्यानुसार मोर्शीची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात येते. पण भाजपने मोर्शीची जागा विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांना सोडण्यस विरोध दर्शविला आहे. तेथे भाजप निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हा अजित पवार यांना धक्का मानला जातो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp may rejected three more sitting mlas from vidarbha print politics news asj