अहिल्यानगर : भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये बोलताना जाहीररीत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याचे सांगितले आहे. त्या पाठोपाठ माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनीही श्रीरामपूरमध्ये बोलताना ‘स्थानिक’च्या निवडणुकांपूर्वी जिल्ह्यात राजकीय भूकंप झाल्यास नवल वाटू देऊ नका, असेही भाष्य केले.
त्यामुळे जिल्ह्यात भाजप आक्रमकपणे ‘स्थानिक’च्या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विखे पिता-पुत्रांच्या या भुमिकेमुळे भाजपच्या वाटेवर कोणकोण आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. असे असतानाच दुसरीकडे भाजप अंतर्गत अस्वस्थता विविध कारणांनी वाढताना दिसत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका यांच्या रखडलेल्या निवडणुका आता दृष्टीक्षेपात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले. या पार्श्वभूमीवर या प्रवर्गातील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे व त्यांचे चिरंजीव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांनी पालकमंत्री विखे यांची भेट घेतली. त्यांच्याबाबत लवकरच निर्णय होईल, असेही विखे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राजेंद्र फाळके यांचीही भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी भेट घेतली. पाथर्डीतील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याला मिळालेल्या अर्थसहाय्यामुळे या कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी प्रताप ढाकणे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागलेले आहे.
राहुरीचे विद्यमान भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने तेथे आता पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने या मतदारसंघात होणाऱ्या राजकीय हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. राहुरी मतदारसंघ विखे पिता-पुत्रांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या मतदारसंघातही भाजपची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराशी झाली होती.
या घडामोडी पाहता ‘ऑपरेशन लोटस’चे लक्ष्य जिल्ह्यात शरद पवार गटाकडे लागलेले दिसते. राष्ट्रवादीकडे खासदार नीलेश लंके व आमदार रोहित पवार हे दोन मोहरे आहेत. मात्र रोहित पवार जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालत नाहीत तर नीलेश लंके यांच्या लढाईला मर्यादा पडू लागल्या आहेत.
गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्यांचा ओघ सुरू झाला होता. त्यातील अनेकांनी अजित पवार गटाचे घड्याळ बांधले तर काहींनीच भाजपचा मार्ग पत्करला. शिवसेनेतील फुटीमुळे ठाकरे गटाचे जिल्ह्यात फारसे प्रभावी अस्तित्व राहिलेले नाही. ठाकरे गटाने जिल्ह्याची जबाबदारी पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे सोपवली. मात्र ते जिल्ह्यात फिरकलेले नाहीत. शिवाय त्यांच्याबद्दल जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांची नाराजीची भावना आहे.
नगर शहरातील बहुतांश पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’चे लक्ष्य शरद पवार गटाकडे लागलेले दिसते. ‘स्थानिक’च्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप त्यांना जिल्हाध्यक्ष पदासाठी सक्षम कार्यकर्ता मिळालेला नाही.
जिल्ह्यात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जाताना दुसरीकडे भाजपमध्ये मात्र अंतर्गत अस्वस्थता वाढते आहे. पक्षातील निष्ठावांतांमध्ये डावलले जात असल्याची भावना वाढीस लागली आहे. नवीन तीन जिल्हाध्यक्ष नियुक्त झाल्यानंतर अनेक जुने पदाधिकारी पक्षाच्या कार्यक्रमातून दिसेनासे झाले आहेत. ‘स्थानिक’ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला या खदखदीलाही तोंड द्यावे लागणार आहे.
