कोल्हापूर : पंचगंगा नदी तुडुंब भरून वाहत असताना ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांना आठवडाभर पाण्यासाठी तंगडेतोड करण्याची वेळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे काळम्मावाडी नळ पाणी योजनेतील दोष शोधून भाजपने प्रकल्पाचे कर्तेधर्ते सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र चढवले आहे. या माध्यमातून भाजपने काळम्मावाडी योजना आणि सतेज पाटील यांना केंद्रस्थानी ठेवत कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा अजेंडा निश्चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारी पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने शाश्वत पाणी योजना म्हणून काळम्मावाडी योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुमारे ६० किमी अंतरावरील ही योजना मंजूर करण्यात तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांचा पुढाकार असला तरी त्यांना तितकीच तोलामोलाची साथ मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.

सन २०१३-१४ मध्ये ४९८८ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेच्या कामाचा प्रारंभ झाला. तीन वर्षात योजना पूर्ण करणे अपेक्षित असताना तिला तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली. योजनाचे काम होत असताना भाजप -ताराराणी आघाडीसह विरोधी आघाडीने या योजनेतील त्रुटीं, मक्तेदार, सल्लागार यांच्यावर टीकास्त्र चढवल्याने महापालिका सभागृहातील वातावरण तापत राहिले होते.

टीकेत नाहले अभ्यंगस्नान

दिवाळीला कोल्हापूरकरांचे अभ्यंगस्नान होणार अशा घोषणा सतेज पाटील – हसन मुश्रीफ हे वारंवार करीत राहिले पण तो कोल्हापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनला होता. अखेरीस दहा वर्षानंतर म्हणजे गतवर्षी दिवाळीच्या आधी काळम्मावाडी योजनेला पूर्तीचा मुहूर्त लागला. आत्यंतिक घाई करीत चलाखीने सर्वांना गाफील ठेवत सतेज पाटील यांनी नवागत पाण्याने अभ्यंगस्नान करून श्रेयाचे पाणी आपल्या एकाच्याच अंगावर ओतून घेतले. पण त्यावरून तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता.

ईडी ते एसआयटी चौकशी

त्यानंतर काळम्मावाडी योजनेला वारंवार गळती, तांत्रिक दोष उद्भवू लागले. यासह या योजनेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडत राजेश क्षीरसागर यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विधानाचा हवाला देत ७५ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून सतेज पाटील यांना पेचात अडकवण्याचा प्रयत्न करतानाच या योजनेची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर सतेज पाटील यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे चोख प्रतिउत्तर दिले होते. आता हेच मुद्दे मांडत भाजपने या योजनेची विशेष पथकाकरवी (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पाटील – महाडिक कोंडीत

गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना कोल्हापूरकरांना आठवडाभर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ महापालिकेच्या दळभद्री, नियोजनशून्य कारभारामुळे आली आहे. हा मुद्दा घेऊन काँग्रेसचे माजी नगरसेवक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत. तर भाजपने जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते प्रा. जयंत पाटील यांना आयात करून सतेज पाटील यांच्यावर टीकेचा रोख ठेवला आहे. काळम्मावाडी योजना पूर्ण होण्यास लागलेला विलंब, त्यातील भ्रष्टाचार, योजनेची सातत्याने होणारे गळती, पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी भटकंती या सर्व घटनांना सतेज पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप जयंत पाटील, भाजपच्या डझनभर नगरसेवकांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोधकांनी जाणीवपूर्वक सतेज पाटील यांना गोवण्याचा प्रयत्न चालवला आहे. उलट, काळम्मावाडी योजनेची वाढीव कामे काढून आमदार अमल महाडिक यांना या माध्यमातून मलिदा लाटायचा आहे असा आरोप करीत विरोधकांचे आव्हान त्यांच्याकडेच परतावले आहे.

महापालिका निवडणुकीची रणनीती

त्यानंतरही जयंत पाटील यांनी सतेज पाटील यांनी नगरसेवकांना पुढे न करता स्वतः आरोप, प्रश्नांची उत्तरे द्यावेत असे प्रति आव्हान दिले आहे. जयंत पाटील यांनी टीकात्मक भूमिका मांडली असली तरी त्याच्या मागे मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक हे असल्याचे लपून राहिले नाही. त्यामुळे कदाचित चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक यांच्याकडून प्रहार झाला तर त्याला सतेज पाटील हे उत्तर देतील असे दिसत आहे. तेव्हा बड्या नेत्यातील वाक्य युद्ध सुरू झाल्यानंतर काळम्मावाडी योजनेच्या दुर्गतीच्या मुद्द्यांना अधिकच उकळी येईल असे दिसत आहे. तूर्तास, काळम्मावाडी योजनेतील दोष आणि त्यास कारणीभूत असणारे सतेज पाटील यांच्यावर रोख ठेवत भाजपने आगामी कोल्हापूर महानगरपालिका
निवडणुकीचा अजेंडा निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे.