छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून कॉग्रेसचे अधिकृत उमदेवार म्हणून जाहीर झालेले नाव नंतर रद्द झाल्यानंतर निवडणुकीतून माघार घेणारे माजी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांच्या प्रवेशासाठी अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी खासे प्रयत्न केले.

ते औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या एम. के. देशमुख यांच्या निर्णयाचे बक्षीस म्हणून त्यांना आता भाजपामध्ये प्रवेश देण्यात आल्याचे मानले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पदवीधर मतदारसंघाच्या तयारीत भाजपने नवा मोहरा पटावर आणला असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात एम. के. देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय कॉग्रेसने घेतला होता. मात्र, उमेदवारी देताना यादीमध्ये ‘ ओबीसी’ चे प्रतिनिधीत्वच दिसत नसल्याने एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात एम. के. देशमुख यांना दिलेली अधिकृत उमेदवारी रद्द करण्यात आली. त्यानंतर लहू साळवे यांना उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा, मुस्लिम व दलित मतपेढी जरांगे आंदोलनामुळे निर्माण झाली होती. त्यामुळे एम. के. देशमुख हे अतुल सावे यांच्या मतदारसंघात प्रबळ उमेदवार ठरू शकतील, असा दावा केला जात होता. मात्र, कॉग्रेसची उमेदवारी रद्द झाल्यानंतर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात कॉग्रेस पंगू झाली.

अतुल सावे यांना निवडून येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये एका अर्थाने एम. के. देशमुख यांना हातभार लागल्याने एम. के. देशमुख यांना भाजपामध्ये घेण्यासाठी अतुल सावे यांनी प्रयत्न केले. आमदार संजय केनेकर यांनीही यात पुढकार घेतल्याचे सांगण्यात आले.

तत्पूर्वी पदवीधर मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्यांनी बरीच खळखळ केल्याचेही सांगण्यात आले. मात्र, भाजपमध्ये एम. के. देशमुख यांनी प्रवेश केला. ‘ अतुल सावे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत आहे, ’असे एम. के. देशमुख यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीतील वातावरण निर्मितीचे बक्षीस असल्याचे मात्र त्यांनी ‘ लोकसत्ता’ शी बोलताना नाकारले. तसे काही नाही. तेव्हा उमेदवारी रद्द झाल्याने अपक्ष निवडणूक लढण्यात काही अर्थ नव्हता,’ असे ते म्हणाले.

शिक्षणाधिकारी पदावरुन निवृत्तीनंतर कॉग्रेसमध्ये प्रवेश घेणाऱ्या देशमुख यांना भाजपने प्रवेश दिला आहे. ते आता शिक्षक किंवा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहेत.