ठाणे : भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघातून भाजपने महेश चौगुले यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊ केली आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत भिवंडी पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक मते मिळाल्याने यंदाची निवडणुक भाजपसाठी सोपी नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत मतविभाजन होऊन त्याचा फटका काँग्रेसला बसून चौगुले हे विजयी झाले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये इच्छूकांची संख्या वाढल्याने उमेदवारी जाहीर होताच बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात असून हि बंडखोरी रोखून मतविभाजन टाळण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.
भिवंडी लोकसभा मतदार संघाची निवडणुक सहा महिन्यांपुर्वी झाली. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या वाट्याला गेली. या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे खासदार सुरेश म्हात्रे हे विजयी झाले. त्यांनी माजी मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला. या निवडणुकीत भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पुर्व या दोन्ही मतदार संघात म्हात्रे यांना मोठे मताधिक्य मिळाले. कपिल पाटील यांना भिवंडी पश्चिममध्ये ४७ हजार ८७८ तर, भिवंडी पुर्वमध्ये ४५ हजार ३७२ इतके मते मिळाली. तर, म्हात्रे यांना भिवंडी पश्चिममध्ये १ लाख ८ हजार ३५८ तर, भिवंडी पुर्वमध्ये १ लाख ८ हजार ११३ इतके मते मिळाली. या दोन्ही मतदार संघात पाटील यांच्यापेक्षा म्हात्रे यांचे मताधिक्य दुप्पट होते. यामुळेच मुस्लीम बहुल असलेल्या या दोन्ही मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार विजयी होतील, अशी आशा मविआ नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात यातील भिवंडी पश्चिम मतदार संघाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. यामुळे काँग्रेस पक्षामध्ये इच्छूकांची संख्या वाढली आहे. कोणार्क विकास आघाडीचे नेते, माजी महापौर विलास पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांच्यासह माजी आमदार रशीद ताहीर, माजी खासदार सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्यासह अनेकजण निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे समजते. मात्र, काँग्रेसने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसून उमेदवार जाहीर होताच पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हे ही वाचा… ठाणे जिल्ह्यात शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार ठरेना
हे ही वाचा… बौद्ध दलित समाजाच्या नाराजीचे भंडारा मतदारसंघात काँग्रेससमोर आव्हान!
गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातून झालेल्या बंडखोरीमुळे मतविभाजन झाले आणि त्याचा फायदा चौगुले यांना होऊन ते विजयी झाले आहेत. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत महेश चौगुले यांनी काँग्रेसचे उमेदवार शोएब खान यांचा ३ हजार ३२६ इतक्या मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार मनोज काटेकर यांना २० हजार १०६, राष्ट्रवादीचे उमेदवार रशीद ताहीर यांना १६ हजार १३१ इतके मते मिळाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मताचे विभाजन झाले होते. त्याचा फायदा चौगुले यांना झाला होता. २०१९ मध्ये चौगुले यांनी अपक्ष उमेदवार खालीद गुड्डू यांचा १४ हजार ९१२ इतक्या मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शोएब खान यांना २८ हजार ३५९, अपक्ष उमेदवार खालीद गुड्डू यांना ४३ हजार ९४५ इतकी मते मिळाली होती. शोएब यांना उमेदवारी मिळाल्याने खालीद यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांना एमआयएमने पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत झालेल्या मतविभाजानामुळे चौगुले निवडून आले होते. त्यामुळे बंडखोरी रोखून मतविभाजन टाळण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे.
© The Indian Express (P) Ltd