मुंबई : महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्येच नव्हे, तर मंत्र्यांमध्येही विविध गोष्टींवरून स्पर्धा किंवा श्रेयवादासाठी चढाओढ असते. आता पंढरपूर येथील आषाढी एकादशी महोत्सव व वारी व्यवस्थापनावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांची स्पर्धा लागली आहे. उभयतांनी पंढरपूरला धाव घेवून पाहणी करीत यंत्रणेला विविध सूचना दिल्या आहेत.
राज्यात किंवा अन्यत्र कोठेही नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्घटना घडल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री महाजन यांना संबंधित ठिकाणी तातडीने पाठवितात. पण गेल्या काही घटनांमध्ये श्रेयवाद किंवा आपलेही अस्तित्व दाखविण्याच्या उद्देशातून भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चढाओढ दिसून येते. महाजन हे आषाढी एकादशीच्या महोत्सवाआधी तीन-चार दिवस तयारीसाठी गेली काही वर्षे जात आहेत. वारकऱ्यांची व्यवस्था, वैद्यकीय तपासणी व आरोग्य शिबीरे, महापूजा आदींचे व्यवस्थापन करण्यासाठी ते जातात. महाजन हे गुरुवारी सायंकाळी रेल्वेने पंढरपूरला जाणार होते. पण शिंदे यांचे गुरुवारी दुपारीच विशेष विमानाने पंंढरपूरला जाण्याचे ठरले. त्यामुळे शिंदे-महाजन हे दोघेही एकत्रच पंढरपूरला गेले.
शिंदे यांनी मोटारसायकलवरुन चंद्रभागा वाळवंट व अन्य ठिकाणी पाहणी केली. तर महाजन यांनी महोत्सवाच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या. महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसही थांबणार असून महोत्सवाच्या नियोजनावर देखरेख ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक येथे २०२७ मध्ये कुंभमेळा होणार असून प्राधिकरणावरील नियुक्त्या व पालकमंत्रीपदावरुनही भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद व चढाओढ आहे. फडणवीस यांना पालकमंत्रीपद महाजन यांना द्यायचे असून त्यावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा केला आहे. त्यामुळे महाजन यांनी कुंभमेळा नियोजनाच्या बैठका नाशिकला जाऊन घेतल्या की त्याच्या आधी किंवा नंतर शिंदे व अन्य नेतेही नाशिकला जाऊन बैठका घेतल्या आहेत.
ईर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची गंभीर दुर्घटना घडल्यावर महाजन व शिंदे हे दोघेही तेथे लगेच धावून गेले होते. कोल्हापूर-सांगलीतील महापूर, पहेलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबाराची घटना यावेळीही फडणवीस यांनी महाजन यांना तेथे राज्य सरकारच्या वतीने समन्वयासाठी पाठविले, मात्र तेथे शिंदेही पोचले होते. राज्यातील महत्वाचे प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्री वॉर रुमच्या माध्यमातून नियंत्रण व देखरेख ठेवली जाते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही काही प्रकल्पांचा आढावा बैठका घेतल्या जातात. महायुती सरकारमध्ये श्रेयवादावरुन चढाओढ सुरु असल्याचे चित्र आहे.