सिद्धेश्वर डुकरे
मुंबई: आगामी निवडणुकांचा हंगाम लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत बदल केले जाणार आहेत. पक्षाच्या विविध आघाड्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत पक्षात विचारविनिमय सुरू झाला आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा तीन वर्षांचा कालावधी संपला आहे. करोना साथीमुळे पाटील यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून मुदतवाढ दिली गेली आहे. २९ एप्रिल २०१८ रोजी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीस पाच वर्षे पूर्ण झाली. पालिका निवडणुका कधी होतील याबाबत अद्याप काहीच स्पष्टता नाही. पालिका निवडणुकांनंतर नवीन प्रदेशाध्यक्ष नेमण्याची पक्षात योजना होती. निवडणुका आणखी लांबणीवर पडणार असल्यास त्यावरही विचार केला जाईल.
हेही वाचा >>>हरियाणात दोन वर्षांपासूनची सर्व रिक्त पदं रद्द होणार, मनोहरलाल खट्टर सरकारचा मोठा निर्णय; विरोधक आक्रमक!
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर विविध आघाड्या, समित्या, सेल यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. या सर्व समित्यांचा कालावधी संपला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बदल करण्याचा पक्षश्रेष्ठीचा विचार आहे. सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात पाच विविध प्रकारच्या संघटना आणि ३० पेक्षा जास्त ‘राष्ट्रवादी सेल’ आहेत.
आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे. या तयारीसाठी पक्षाने पक्षाअंतर्गत सर्व सेल, संघटनांची नव्याने बांधणी करण्याचे ठरवले आहे. पक्षात राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, युवती काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, सेवादल काँग्रेस अशा पाच संघटना आहेत.