छत्रपती संभाजीनगर : आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले. पूर्वी त्यांना पाठिशी घालणे ही चूक होती असे म्हणत त्यांच्याविषयीच्या प्रश्नाची उत्तरे देणेही अप्रतिष्ठेचे ठरविण्याइतपतचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि पक्षपातळीवर स्वतंत्र निर्णय घेण्याची वेळ आल्यावर अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना अभय दिले. त्यामुळे धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये असणे अपरिहार्यता आहेत का, असा प्रश्न विचारला जात आहे. नेत्यांना अभय आणि कार्यकर्त्यांसमोर फटकेबाजी या अजित पवार यांच्या कृतीनंतर धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री भगवान गडावर मुक्काम केला. त्यानंतर नामदेवशास्त्री यांनी धनंजय मुंडे गुन्हेगार नसल्याचा निर्वाळा दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीडच्या वंजारी आणि मराठा जातीमधील तेढ आणि त्यातून निर्माण होणारा रोष भाजपकडे झुकू न देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या मंत्री पदाचे निर्णयावर अजित पवार यांची अंतिम मोहर लागेल अशा आशयाचे विधान मुख्यमंत्र्यांनी अलिकडेच केले. अजित पवार हे एक घाव दोन तुकडे या श्रेणीत मोडणारे नेते असल्याचे वारंवार सांगितले जाते. मात्र, पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यास अजित पवार यांनी लावलेला उशिर नक्की कोणत्या कारणासाठी असा प्रश्न विचारला जात आहे. ‘ चारित्र्य सांभाळा’. ‘खंडणी मागितली तर मकोका लावण्यास मागेपुढे पाहणार नाही,’ अशी वक्तव्ये अजित पवार यांनी केली. त्यामुळे बीड जिल्ह्यात पक्षाच्या स्तरावरही साफसफाई होईल असे संकेत असले तरी नेत्यांना अभय मिळेल, अशीच अजित पवार यांची कृती आहे, असे निरीक्षण आता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

बीडमधील कार्यकर्ते सर्रास धमक्या देताता, खंडणी मागतात अशा तक्रारी असल्याने अजित पवार यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे खंडणी मागू नका, असे सांगावे लागले. त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ वाल्मिक कराड यांच्यावरील आरोपाशी जोडला गेला असल्याने वाल्मिकने खंडणी मागितली होती, या आरोपास बळकटी मिळत असल्याचाही युक्तीवाद आता केला जाऊ लागला आहे.

बीड जिल्ह्यातील राजकारणाला गोपीनाथ मुंडे यांनी धार दिली होती. पवार विरोधी इंजिन वापरुन बांधणी करणाऱ्या भाजपच्या नव्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले. मात्र, पवार विरोधाचे हे इंजिन ‘ ओबीसी’ मतपेढीचा मुख्य आधार बनला होता. धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने ही मते पहिल्यांदा भाजपविरोधात येत होती. त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकीय संरक्षण दिले होते. तीच स्थिती कायम रहावी म्हणून अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना अभय देण्याची भूमिका स्वीकारली असावी असे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीमधील ओबीसी चेहरा असणारे छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्यापर्यंतची तयारी असल्याची चर्चा सुरू असल्याने मुंडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्याचा पर्याय स्वीकारला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Despite pressure why ajit pawar is backing dhananjay munde print politics news asj