आज दिवसभरातील पाच महत्वाच्या राजकीय बातम्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर पलंग लावण्यासाठी २१ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चाकण येथील एका कार्यक्रमात पक्षातील कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. भारत-पाकिस्तान यांच्यातील फायनल सामन्यावरून खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल, असा टोला इम्तियाज जलील यांनी शिंदेसेनेला लगावला. पवार कुटुंबाने पोसलेल्या गुंडांनीच आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला. महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी २१ लाखांचा पलंग : सुषमा अंधारे
‘राज्यातील पूरग्रस्तांना मदत नाही, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पलंग बसवण्यासाठी २१ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली,’ असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. भाजपा हा काही मोठा पक्ष नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना पक्षातील नेत्यांना ब्लॅकमेल करून त्यांनी भाड्याने पार्टी जमवलेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजपासह मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. “एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी ५० हजार प्रति हेक्टर नुकसान भरपाई देण्याची मागणी करत आहे. मात्र, फडणवीसांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही. दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर २१ लाख रुपयांचा पलंग लावण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. महायुतीचे इतर नेतेही पूरग्रस्त भागात राजकीय पर्यटन करण्यासाठी जात आहेत,” असा टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावला.
आणखी वाचा : ‘राहुल गांधी भाजपाचे एजंट’ माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप, काँग्रेसचे प्रत्युत्तर; इंडिया आघाडीत फूट?
बैलाला साखळी घालतात तसं काहीजण… अजित पवारांच्या कानपिचक्या
गळ्यात सोन्याच्या साखळी घालून फिरणाऱ्या पक्षातील पक्षातील कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानपिचक्या दिल्या. “सोन्याचे दागिने महिलांनाच शोभून दिसतात. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. गळ्यात जाडजूड साखळ्या घालणारे पुरुष हे साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात”, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज चाकण येथील एका ज्वेलर्सच्या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना “लहानातल्या लहान माणसांपासून अनेक लोकांना सोन्याचे दागिने वापरायला आवडते. एखादा प्रसंग आलाच तर सोने गहाणही ठेवता येते. आपल्याकडे गोल्डन मॅन म्हणूनही काहींची ओळख आहे. कुणीतरी तर सोन्याचे कपडेही शिवले होते. पण ते सगळे अति होत आहे. सोने हे आपल्या आईच्या, पत्नीच्या किंवा बहिणीच्या अंगावर शोभून दिसते. पुरुषांच्या अंगावर एवढे सोने काही शोभून दिसत नाही त्यामुळे उगीचच त्या भानगडीत पडू नका,” असा सल्ला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. बैलाला साखळी घालतात तसे काहीजण सोन्याच्या साखळ्या घालून फिरतात, असा उपरोधित टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
माजी खासदार इम्तियाज जलील यांचा शिंदे सेनेला टोला
गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल, असा टोला एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना शिंदे गटाला लगावला. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतीपिके पाण्याखाली गेली आहेत. एमआयएम पक्षाकडून सध्या पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली जात आहे. आज जलील यांनी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त तिऱ्हे गावाला भेट दिली. राज्य सरकारकडून पूरग्रस्त लोकांना अद्यापही मदत दिली गेली नाही. मंत्र्यांनी या भागांना भेट देताना फोटोसेशन बंद करावेत, अशी टीका यावेळी जलील यांनी केली. “मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात गुगल मॅपच्या माध्यमातून पूरस्थितीची पाहणी करावी आणि गुगल मीटिंगमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होत आहे. गुवाहाटी येथून आणलेले पैसे जर दिले, तर महाराष्ट्रातील लोकांना होणारा त्रास एका मिनिटात संपेल”, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावला.
तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? खासदार संजय राऊत संतापले
रविवारी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास नकार दिला. त्याबाबत माध्यमांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी संताप व्यक्त केला. “सध्या नौटंकी सुरू असून तुम्ही मैदानावर एकत्र खेळता. या सामन्याला सर्व राष्ट्रभक्तांनी विरोध केला होता. १५ दिवसांपूर्वीच त्याच मोहसीन नक्वींबरोबर भारतीय संघाने हस्तांदोलन करून फोटो काढले होते. मग तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का?” असा प्रश्न राऊतांनी यावेळी उपस्थित केला. “मैदानावरचे एक रुप वेगळे असून आतले रूप वेगळे आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही लोकांना मूर्ख बनवण्याची प्रेरणा पंतप्रधान मोदी यांच्याकडून घेतली आहे का?” असे म्हणत राऊतांनी भारतीय खेळाडूंवर संताप व्यक्त केला. तुम्ही पाकिस्तानबरोबर का खेळलात हा आमचा मूळ प्रश्न आहे. आमच्या हुतात्म्यांचा हा अपमान असल्याची टीकाही राऊतांनी केली.
पवार कुटुंबाने पोसलेल्या गुंडांनीच माझ्यावर हल्ला केला : लक्ष्मण हाके
ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या कारवर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात शनिवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला. ओबीसींच्या एल्गार सभेसाठी ते जात असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात हाके यांच्या कारचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या हल्ल्याबाबत एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण हाकेंनी संताप व्यक्त केला. “माझ्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तींचे फोटो समोर आले आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार नीलेश लंके यांच्याबरोबर हल्लेखोरांचे फोटो आहेत. या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. माझी आणि हल्लेखोरांचे काही वैर नाही, पण पवार कुटुंबाने पोसलेल्या गुंडांनीच माझ्यावर हल्ला केला, असा आरोप हाके यांनी केला. आजपर्यंत माझ्यावर ८ ते ९ हल्ले झाले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही, अशी खंतही हाके यांनी बोलून दाखवली.